नागपूर : बनावट नोटांचा धंदा करणाऱ्या परवेज उर्फ पप्पू पटेलच्या घर आणि कार्यालयावर बुधवारी अॅन्टी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस)ने धाड टाकली. पप्पूकडे मोठ्या प्रमाणात बनावट नोटा असून त्या नोटा तो बाजारात पसरवणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. झडतीदरम्यान एटीएसच्या पथकाने एकूण 27.50 लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही रोकड बनावट नोटांच्या व्यवहाराशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे 8 मे 2023 रोजी शहर पोलिसांनीही पप्पू आणि त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात पप्पूसह त्याचा खास पराग मोहोड याला ही अटक झाली होती. न्यायालयातून जामीन घेऊन पप्पू बाहेर आला आणि पुन्हा बनावट नोटांच्या धंद्यात सक्रिय झाला. एटीएसने बुधवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास पप्पूच्या घरावर धाड टाकली. त्याच्या वसीम नावाच्या साथीदारालाही अटक करण्यात आली. दोघांनाही सोबत घेऊन पथकाने हसनबाग येथील त्याच्या बिलाल इंटरप्रायजेस नावाच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आली. येथे झडतीदरम्यान मोठी रोकड पथकाच्या हाती लागली. ही रोकड पप्पूकडे कुठून आली याचे समाधानकारक उत्तर तो देऊ शकला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत पथकाकडून पप्पू आणि वसीमची चौकशी सुरू होती.
बनावट नोटांचा धंदा करणारा पप्पू सराईत गुन्हेगार आहे. त्याने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात आपले जाळे पसरवून ठेवले होते. लोकांना लुबाडण्यासाठी त्याने एजन्ट ठेवले होते. ते एजन्ट लोकांना खऱ्या नोटांच्या बदल्यात दुप्पट बनावट नोट देण्याची बतावणी करीत होते. विश्वास बसण्यासाठी सुरुवातीला लोकांना खऱ्याच नोटा दिल्या जात होत्या. त्या नोटा खऱ्याच असल्याने बाजारात कोणतीही अडचण न येता चालायच्या. त्यानंतर खऱ्याच्या बदल्यात बनावट नोटांचा सौदा करण्यासाठी बोलावण्यात येत होते. या दरम्यान बनावट पोलिसांकडून धाड टाकण्यात येत होती. प्रकरण रफा-दफा करण्यासाठी ग्राहकाने आणलेली सर्व रक्कम जप्त केली जायची. अशाप्रकारे पप्पू आणि त्याच्या टोळीने अनेकांना लुटले. काही खरे पोलिसही त्याच्या टोळीत सामील होते. तुरुंगातून बाहेर येताच पप्पू पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.