Navratri 2023 : नवरात्र प्रथम दिवशी करा देवी शैलपुत्रीचे पूजन; जाणून घ्या काही खास गोष्टी

15 Oct 2023 12:23:17

navratri-2023-starts-with-worship-of-shailputri-devi - Abhijeet Bharat
 
नागपूर : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरूवात झाली आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या उत्सवात सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण बघायला मिळते. बऱ्याच ठिकाणी देवीची प्रतिमा स्थापित केली जाते. घरोघरी घटस्थापना केली जात असून यावेळी भाविक देवीसमोर अखंड ज्योत ही लावतात. अशात नवरात्रच्या प्रत्येक दिवसाचे विशेष असे महत्व आहे. तसेच या ९ दिवसांत ९ देवींचे पूजन केले जाते. नवरात्रच्या या उत्सवाची सुरुवात म्हणजे पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीचे पूजन करून केली जाते.
 
देवी शैलपुत्री यांची कथा...
 
शैलपुत्री देवी ही पर्वतांचा राजा हिमालय यांनीच कन्या आहे, असे म्हटले जाते. शैलपुत्री देवीचे दुसरे नाव म्हणजे सती. सती ही प्रजापती दक्ष यांची मुलगी. असे म्हटले जाते की, एकदा प्रजापती दक्ष यांनी यज्ञ करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी सर्व देवी-देवतांना आमंत्रण पाठवले. परंतु, महादेव यांना आमंत्रण पाठवले नाही. आता देवी सती त्या यज्ञात जाण्यास इच्छुक होती, परंतु आमंत्रण नसल्याने तिथे जाणे योग्य नाही असा विचार करून महादेवाने जाण्यास नकार दिले. परंतु, सतीने ऐकले नाही आणि वारंवार यज्ञात जाण्याचे आग्रह करू लागली. सतीच्या आग्रहापुढे महादेव काही म्हणू नाही शकले आणि सतीला तिथे जाण्याची अनुमती दिली.
 
देवी सती जेव्हा आपले वडील प्रजापती दक्ष यांच्याकडे पोहोचली, तेव्हा त्यांच्यासोबत यथोचित व्यवहार झाला नाही. केवळ तिच्या आईने तिला प्रेमाने जवळ बोलावले. तिच्या बहिणीने तिच्या पतीची थट्टा केली आणि अपमान केला. प्रजापती दक्ष यांनी देखील त्यांचा तिरस्कार केला. असे अपमानजनक व्यवहार सतीला सहन झाले नाही आणि तिने असे पाऊल उचलले, ज्याची कोणी कल्पना देखील केली नव्हती.
 
सतीने त्याच यज्ञातील अग्नीत आत्मदहन केले. महादेवाला जसे याबद्दल कळले, ते खूप दुःखी झाले. त्यांचा राग अनावर झाला. असे म्हणतात की, या घटनेमुळे महादेवाने संपूर्ण जगात प्रलय आणले होते. याच सतीने पुन्हा पर्वतांचा राजा हिमालयाच्या मुलीच्या रूपात जन्म घेतला, म्हणून तिचे नाव शैलपुत्री असे आहे.
 
शैलपुत्री म्हणजेच पार्वती
 
देवी शैलपुत्रीचा वास्तव्य हा काशी, वाराणशी येथे आहे, असे म्हटले जाते. येथे शैलपुत्री देवीचे प्राचीन मंदिर सुद्धा आहे. मान्यतेनुसार, या मंदिराचे केवळ दर्शन केल्यानेसुद्धा मनोकामना पूर्ण होतात. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैपुत्री देवीचे दर्शन केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व दुःख दूर होतात, असेही म्हटले जाते. शैलपुत्रीचे वाहन हे वृषभ असल्याने तिला वृक्षरुद्ध सुद्धा म्हटले जाते. देवीच्या डाव्या हातात कमळाचे फुल तर उजव्या हातात त्रिशूल असते. शैलपुत्री ही निसर्गाची माता आहे आणि शक्तीचे प्रतीक आहे.
Powered By Sangraha 9.0