नागपूर : दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील एका नव्या कथानकासह मराठी सिनेप्रेमींच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहे. ढग आणि भोंगा या दोन उत्कृष्ट मराठी चित्रपटानंतर शिवाजी लोटण पाटील त्यांचा आगामी 'आतुर' हा चित्रपट घेऊन आले आहेत. 'आतुर' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
'आतुर' चित्रपटाचा फर्स्ट लूक ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. तर ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. हे पोस्टर बघून प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहोचली आहे. अशातच एखाद्या गोष्टीची आतुरता माणसाला वेड करू शकते, असा हा शिवाजी लोटण पाटलांचा नवा चित्रपट 'आतुर' 3 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जेनिथ फिल्म्स प्रोडक्शन हाऊसचा हा चित्रपट असून कुणाल निंबाळकर यांचे कार्यकारी निर्माता आहेत. तसेच छायांकन मयुरेश जोशी यांचे असून कथा आणि पटकथा तेजस परस्पतकी, आनंद निकम, किरण जाधव यांची आहे.
दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांच्या आगामी 'आतुर' चित्रपटात अभिनेत्री प्रिती मल्लापुरकर ही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय तिच्यासोबत योगेश सोमण, चिन्मय उदगीरकर, प्रणव रावराणे हे देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.