जैसी करणी वैसी भरणी!

    09-Jan-2023
Total Views |

terrorist attacks in pakistan
(Image Source : Internet/ Representative image)
 
 
पाकिस्तान (Pakistan) म्हंटले की जगापुढे येतो तो दहशतवाद. पाकिस्तानचे दुसरे नावच दहशतवाद आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आजवर पाकिस्तानने एकच काम केले आहे, ते म्हणजे दहशतवाद वाढवणे, दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवणे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळे स्थापन करणे, त्यांना लष्करी मदत पुरवणे, हेच काम पाकिस्तान आजवर करत आला आहे. म्हणूनच पाकिस्तानला दहशतवादाची फॅक्टरी असे म्हटले जाते.
 
बरं ही फॅक्टरी कोणासाठी काढली तर भारतासाठी. भारतासोबत समोरासमोर युद्ध झाल्यास टिकाव लागणार नाही, हे माहिती असल्याने दहशतवाद पसरवून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. बरे इतके करूनही पाकिस्तान भारताला अस्थिर करू शकला का? तर नाही. उलट भारत आज जगातील प्रगतशील राष्ट्र म्हणून ओळखले जाते. जग भारताकडे भावी महासत्ता म्हणून पाहते तर पाकिस्तानकडे दहशतवादी राष्ट्र म्हणून पाहत आहे. म्हणतात ना जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तोच त्यात आधी गाडला जातो. पाकिस्तानने भारताविरोधात जो दहशतवादाचा भस्मासुर उभा केला ना आता तोच दहशतवादाचा भस्मासुर पाकिस्तानलाच भस्म करायला निघाला आहे.
 
हो हे खरे आहे. जगासमोर दहशतवादाचे संकट उभे करणाऱ्या पाकिस्तानसमोरच आता दहशतवादाचे संकट उभे राहिले आहे. पाकिस्तानात दहशतवादी घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अफगाणिस्तान सीमेवर दहशतवादी घटनांत अलीकडे खूप वाढ झाली असून ही वाढ अफगाणिस्तान सीमेवरील दहशतवाद पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पाकिस्तानात बंदी असलेल्या तेहरिक ए पाकिस्तान तालिबान (TTP) या दहशतवादी संघटनेचा यामागे हात असल्याचे बोलले जाते. या संघटनेसोबत पाकिस्तानची असलेली शस्त्रसंधी नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आली, तेव्हापासून तिथे मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. या संघटनेने नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात १०० हून अधिक हल्ले केले आहेत तर डिसेंबरमध्ये ६० हून अधिक हल्ले केले आहेत. या हल्ल्यात दोन हजारांहून अधिक पाकिस्तानी सुरक्षा राक्षकांचा मृत्यू झाला आहे. या संघटनेची ताकद इतकी वाढली आहे की त्यांनी थेट पाकिस्तानी सरकारलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि त्यांच्या सरकारचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
 
अफगाणिस्तान सीमेवरील वजरीस्थान आणि स्वात या दोन प्रांतात त्यांनी स्वतःचे शासन स्थापन केले असून तिथे कट्टर इस्लामिक राजवट सुरू केली आहे. या संघटनेला तालिबानचा पाठिंबा असून या संघटनेमार्फतच तालिबान पाकिस्तानवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. वास्तविक जेव्हा सर्व जग तालिबानला विरोध करत होते, तेव्हा हाच पाकिस्तान तालिबानने समर्थन करत होता. अफगाणिस्तानात जेव्हा तालिबानी राजवट सुरू झाली, तेव्हा तालिबानला मान्यता देणारा पाकिस्तान हाच पहिला देश होता. तालिबानला मान्यता देण्यामागे पाकिस्तानचा मनोदय असा होता की तालिबानला समर्थन दिल्याने तालिबान भारतात दहशतवादी हल्ले करेल, पण झाले उलटेच. तालिबान भारतात नव्हे तर पाकिस्तानातच दहशतवादी हल्ले करत आहे. तेहरिक ए पाकिस्तान तालिबान ही दहशतवादी संघटना पाकिस्तानचे आणखी तुकडे करतील, असा कयास अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दहशतवाद्यांच्या मदतीने भारताचे तुकडे पाहण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पाकिस्तनाचेच आता तुकडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताविरोधात वापरलेले दहशतवादाचे शस्त्र आता पाकिस्तानवरच बुमरंग झाले आहे. यालाच म्हणतात जैसी करणी वैसी भरणी.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.