(Image Source : Internet)
बीड :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कारला मंगळवारी रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात धनंजय मुंडे सुदैवाने बचावले असून यांच्या छातीला मार लागला आहे. याशिवाय त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अपघाताविषयी माहिती दिली आहे. याशिवाय पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटू आटपून धनंजय मुंडे आपल्या गाडीने परळीकडे परतत होते. दरम्यान रात्री १२.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. परळी शहरातील मौलाना आझाद चौकाजवळ त्यांचा गाडीला अपघात झाला. यात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला. या अपघातात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीचा समोरचा भाग पूर्णच चक्काचूर झाला आहे. अशात धनंजय मुंडे यांना पुढील उपचारासाठी एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात येणार आहे. मुंबईतील ब्रीच कांडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून अपघाताबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.' याशी त्यांच्या कार्यालयाने देखील ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.