सार्वत्रिकीकरण झाल्‍यास मराठी भाषा वाढेल - आशा पांडे

25 Jan 2023 13:59:47
- ‘पत्रकारितेतील मराठी भाषेत झालेले बदल’ विषयावर परिसंवाद रंगला

Granthasahavas 
 
नागपूर :
इंग्रजी शाळांतील मुलांना मराठी शिकवणे, मराठी व इंग्रजीचा दर्जा समान असणे, विविध मराठी बोलींची एक सामा‍यिक भाषा विकसीत करणे, बाहेरून महाराष्‍ट्रात आलेल्‍यांना मराठी सक्‍तीची करण्‍यासारख्‍या उपायांतून भाषेचे सार्वत्रिकीकरण झाल्‍यास मराठी भाषेचे संवर्धन होईल, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ साहित्यिक आशा पांडे यांनी केले.
 
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात असून त्यानिमित्त विदर्भ साहित्य संघ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'पत्रकारितेतील मराठी भाषेत झालेले बदल' या विषयावर मंगळवारी परिसंवाद घेण्‍यात आला. मंगळवारी विदर्भ साहित्य संघातील ग्रंथसहवासमध्‍ये झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री आशा पांडे होत्या. ज्येष्ठ संपादक पत्रकार सुधीर पाठक, पत्रकार अनंत कोळमकर आणि पत्रकार मंदार मोरोणे हे वक्ते म्हणून सहभागी झाले होते. परिसंवादाचे उदघाटन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणजे मराठी भाषेचा उत्सव असून मराठी भाषेचे वैभव दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
विदर्भ साहित्य संघाने मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्‍यासाठी सामान्‍य मराठी भाषेची परीक्षा घ्यावी, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करताना आशा पांडे यांनी मराठीचे संवर्धन करण्‍याची समस्‍त मराठीजनांची जबाबदारी असल्‍याचे सांगितले. सुधीर पाठक यांनी पूर्वी वर्तमानपत्रांमध्‍ये प्रमाणित भाषेचा कसा आग्रह धरला जायचा व त्‍यामुळे कसे भाषेचे संस्कार व्हायचे हे सोदाहरण स्‍पष्‍ट केले.
 
बातम्यांचा वेग, तंत्रज्ञान आले, आकर्षक मांडणीच्‍या आग्रहामुळे शुद्धलेखन, प्रमाणभाषेकडे दुर्लक्ष झाल्‍याचे ते म्‍हणाले. भाषेचे सौंदर्य टिकवण्‍यासाठी तिचे संवर्धन करणे आवश्‍यक असून शाळा, महाविद्यालयांमध्‍ये शुद्ध, प्रमाणित भाषा शिकवण्‍यासाठी वि. सा. संघाने पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन अनंत कोळमकर म्‍हणाले. तिस-या पिढीचे प्रतिनिधीत्‍व करणाऱ्या मंदार मोरोणे यांनी मराठी भाषा टिकवण्याची जरी जबाबदारी वर्तमानपत्रांची असली तरी भाषा सुधारण्‍याची कोणतीही यंत्रणा माध्‍यमांमध्‍ये नाही, असे सांगितले. आजच्‍या पत्रकारितेने अनेक इंग्रजी शब्‍दांचे मराठीकरण केल्‍यामुळे भाषा समृद्ध झाली असल्‍याचे सांगताना त्‍यांनी पुढची पिढी जपानी, इंग्रजी, आफ्रिकन, कोरियन अशा अनेक भाषांचा वापर करणारी असल्‍यामुळे भविष्‍यात वर्तमानपत्राना सर्व भाषांचा संकर, संगम करावा लागेल, असे उद्गार काढले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष राजेन्द्र डोळके यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विवेक अलोणी यांनी केले.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
Powered By Sangraha 9.0