डॉ. होमी जहांगीर भाभा

    24-Jan-2023
Total Views |

dr homi jehangir bhabha
 
 
भारताच्या आण्विक शक्तीचे जनक असे ज्यांना म्हटले जाते, त्या डॉ. होमी जहांगीर भाभा (Dr. Homi Jehangir Bhabha) यांचा आज स्मृतिदिन. स्वतंत्र भारताला समर्थ आणि बलवान बनवण्यासाठी ज्या महान व्यक्तींनी जीवाचे रान केले, त्यात डॉ. होमी जहांगीर भाभा याचे नाव आवर्जून घेतले जाते. डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी अणू आणि अवकाश क्षेत्रात जे कार्य केले, त्यामुळे जगभर भारताचे नाव झाले.
 
डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म सदन पारशी कुटुंबात ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. त्यांच्या वडिलांना वाचनाची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी खूप पुस्तके गोळा केली होती, त्यात विज्ञान या विषयाचीही पुस्तके होती. डॉ. होमी यांना लहानपणापासून विज्ञानाची आवड होती. त्यामुळे त्यांनी विज्ञानाची अनेक पुस्तके वाचून काढली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर होमी यांनी इंजिनिअर व्हावे, असे त्यांचा वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी आपल्याला गणित आणि पदार्थ विज्ञान हे विषय आवडतात आणि त्यातच आपण करियर करणार असे वडिलांना ठामपणे सांगीतले. वडिलांनी त्यांना या विषयात करियर करण्यास परवानगी दिली पण आधी इंजिनिअरिंग पूर्ण करण्याची अट घातली. त्यामुळे होमी यांनी १९३० साली केम्ब्रिज विद्यापीठातून पहिल्या श्रेणीत इंजिनिअरिंग पूर्ण केले. तसेच पॉल डिरेक यांच्या मार्गदर्शनाखाली गणित आणि पदार्थ विज्ञान या विषयांचा अभ्यासही केला. गणित आणि पदार्थ विज्ञान या विषयात त्यांना खूप गती होती त्यामुळे या विषयात त्यांनी अनेक बक्षिसे आणि शिष्यवृत्त्या मिळवल्या. १९४० साली ते भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांनी बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले.
 
१९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुढे याच संस्थेचे ते संचालक बनले. संचालक असतानाही त्यांनी आपले संशोधन कार्य सोडले नाही. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने भारत सरकारने अणू ऊर्जा आयोगाची स्थापना केली. या संस्थेचेही ते संचालक होते. या संस्थेत त्यांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली, तेव्हा मुल कण, नवे सिद्धांत, नवे तंत्रे उदयास आली होती. त्यात डॉ. होमी भाभा यांनी मोलाची भर टाकली. १९५४ च्या ऑगस्ट महिन्यात भारत सरकारने अणुऊर्जा विकासासाठी स्वतंत्र खातं निर्माण केले. त्यावेळी या खात्याचे पहिले सचिव म्हणून डॉ. होमी भाभा यांचीच निवड करण्यात आली. या अणुऊर्जा विकास संशोधन खात्याने मुंबईत तुर्भे येथे देशातील पहिले अणू विषयक संशोधन करणारं केंद्र डॉ. भाभा यांच्याच नेतृत्वाखाली उभे केले. त्यानंतर १९५६ साली देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली अणुभट्टी सुरु करण्यात आली.
 
अणुविषयक व आंतरीक्ष विषयक अशा दोन्हीही क्षेत्रात महत्वपूर्ण आणि भक्कम पाया घालण्याचं श्रेय हे डॉ होमी जहांगीर भाभा यानांच जाते. अणुशक्तीचा वापर विघातक कामासाठी नव्हे विधायक कामासाठी झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. १९५५ मध्ये जिनिव्हा येथे भरलेल्या आणि संयुक्त राष्ट्र संघामार्फत आयोजित अणुऊर्जेचा वापर शांततामय विकासकार्यासाठी वापर या विषयाच्या परिसंवादाचे डॉ भाभा हे अध्यक्ष होते. या परिसंवादात त्यांनी अणुऊर्जेचा वापर अणुबॉम्ब तयार करण्यासाठी न करण्याचे आव्हान सर्व देशांना केले होते. डॉ होमी जहांगीर भाभा यांनी अणुऊर्जा आणि आंतरीक्ष क्षेत्रात जे महान कार्य केले त्यामुळे त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. भारत सरकारनेही त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. २४ जानेवारी १९६६ रोजी स्वित्झर्लंड मधल्या मॉं ब्लँ या उंच शिखरावर झालेल्या भीषण अपघातात या महान शास्त्रज्ञाचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तुर्भे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणुसंशोधन केंद्र असे करण्यात आले. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.