गृहसजावट क्षेत्रात नवतंत्रज्ञान विकसीत व्‍हावे - नितीन गडकरी

22 Jan 2023 14:03:03

union minister nitin gadkari at design showcase 2023
 
 
नागपूर:
गृहनिर्माण करताना त्‍यात गृहसजावटीला अनन्‍य साधारण महत्व असते. विविध क्षेत्रात नवतंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून गृहसजावटीच्‍या क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञान विकसित होण्याची गरज आहे. नवीन पिढीने या व्यवसायात आमूलाग्र बदल घडवण्‍यासाठी डिझाईन शोकेस या महोत्सवाचा लाभ करून घ्‍यावा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्सची (आयआयआयडी) सुवर्ण जयंती व नागपूर रिजनल चॅप्‍टरच्‍या रजत जयंती महोत्‍सवानिमित्‍त नागपूर चॅप्‍टरच्‍यावतीने आयोजित 'डिझाईन शोकेस २०२३' या महोत्सवाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांसह विद्यार्थ्याशी संवाद साधला.
 
union minister nitin gadkari at design showcase 2023
 
 
सिव्हील येथील चिटणवीस सेंटरमध्ये या तीन दिवसीय डिजाईन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला आयआयआयडी प्रेसिडेंटर इलेक्‍ट जिग्‍नेश मोडी, प्रेसिडेंट सरोश वाडिया व नागपूर चॅप्‍टरच्‍या अध्‍यक्ष अरुंधती साठे, सचिव आरती सहाणे, संयोजक प्रार्थना नांगिया, सह-संयोजक भूषण जेसवानी, सीमा अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
नितीन गडकरी म्हणाले, अशा पद्धतीचा महोत्सव आयोजित करण्याचा खूप चांगला प्रयत्न आहे. गुजरातमधील एका उद्योजकाने घर बांधणी व त्‍यांच्‍या आकर्षक सजावटीसाठी कचऱ्यांचा आणि अडगळीत ठेवण्यात आलेल्या वस्तूंचा अतिशय समर्पक आणि सुंदर उपयोग केलेले बघायला मिळाला. असेच काही नवनवे प्रयोग या क्षेत्रात कार्यरत असलेल्‍या नवीन पिढीने करायल हवेत, असे ते म्हणाले. यावेळी गडकरी यांनी महोत्सवात प्रदर्शनातील प्रत्येक दालनाला भेट दिली व संबंधितांशी संवाद साधला. महोत्सवात सजावटीबाबत विविध विषयावर तज्ञांची भाषणे झाली.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
 
Powered By Sangraha 9.0