टेनिस स्टार सानियाची निवृत्ती

    20-Jan-2023
Total Views |

sania mirza
(Image Source : Internet)
 
 
भारताची आघाडीची महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने (Sania Mirza) आंतरराष्ट्रीय टेनिस मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या दुखापती अणि हरवलेला फॉर्म त्याचसोबत कौटुंबिक कलह या कारणांमुळे सानियाने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. या बाबतची घोषणा तिने स्वतःच केली असून पुढील महिन्यात दुबईत होणारी दुबई टेनिस चॅम्पियनशिप ही तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असून या स्पर्धेनंतर ती व्यावसायिक टेनिसला कायमची रामराम ठोकणार आहे.
 
वास्तविक मागील वर्षीच ती टेनिसला रामराम ठोकेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तरीही ती एक वर्ष खेळत राहिली. मात्र त्यात तिला विशेष काही करता न आल्याने अखेर तिने यावर्षी निवृत्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. सानिया मिर्झाचा हा निर्णय अपेक्षितच होता. कारण आता तिचे वय ३६ वर्ष आहे. कोणत्याही खेळातील खेळाडूंसाठी हे वय निवृत्तीचेच असते. त्यात टेनिस खेळातील खेळाडूंना जबरदस्त फिटनेस हवा असतो. त्यामुळे ३० वर्षानंतर हे खेळाडू निवृत्ती स्वीकारतातच. सानिया मिर्झाने स्वतः याबाबत सांगितले की 'माझे शरीर कमजोर झाले असून गुडघे सतत दुखत असतात. कोणत्याही खेळांमध्ये जिंकणे हेच महत्वाचे नसते, तर खेळण्याचा आनंदही घेता आला पाहिजे. मी खेळाचा आनंद घेऊ शकेल, असे वाटत नाही. माझी प्रेरणा माझी ऊर्जा आता कमी झाली आहे.'
 
सानियाच्या या वक्तव्यावरून तिची आता पुढे खेळायची इच्छा नाही, असेच दिसून येते. सानिया मिर्झाचा हा निर्णय तिच्या चाहत्यांनी देखील स्वीकारला असून त्यांनी तिच्या या निवृत्तीचे स्वागत केले आहे. सानियाने २००३ मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. याचाच अर्थ यावर्षी तिच्या कारकिर्दीला २० वर्ष पूर्ण होत आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी सलग २० वर्षे खेळत राहणे ही खूप मोठी बाब आहे. कारण सतत २० वर्ष स्वतःचा फिटनेस ठेवत उत्तम कामगिरी करत राहणे, ही वाटते तेवढी सोपी बाब नाही. सानियाने ती साध्य केली. याबाबत सानियाचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. या दरम्यान तिने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
 
अविरत २० वर्ष आंतरराष्ट्रीय सामने खेळून तिने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. तिने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत ६ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. महिला दुहेरीमध्ये २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, २०१५ मध्ये विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन, २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, २०१५ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०१४ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. भारताच्या कोणत्याही महिला टेनिस खेळाडूंनी देशासाठी इतकी दैदिप्यमान कामगिरी केलेली नाही. महिला एकेरी मध्येही तिने पहिल्या १०० खेळाडूत स्थान मिळवले होते. महिला एकेरीत पहिल्या १०० खेळाडूत समाविष्ट होणारी ती भारताची एकमेव महिला टेनिसपटू आहे. तिने तिच्या कारकिर्दीत मार्टिना हिंगिस, स्वेटलाना कुजनेतसेवा, नाडीया पेगोवा यासारख्या महान खेळाडूंना पराभवाची धुळ चारली आहे.
 
सानिया ही केवळ भरताचीच नाही तर जगातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गणली जाते. विशेषतः महिला दुहेरीमध्ये ती जगातील महान खेळाडू म्हणून गणली जाईल यात शंका नाही. भारताची तर ती अव्वल खेळाडू म्हणूनच गणली जाईल. निवृत्ती नंतरच्या कारकिर्दीसाठी सानियाला मनापासून शुभेच्छा!
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.