मुंबई पोलिसांकडून राखी सावंतला अटक; असे आहे कारण

    19-Jan-2023
Total Views |
 
actress rakhi sawant arrested by mumbai police
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) केवळ सोशल मीडियावरच नाही तर मनोरंजन जगतातही चर्चेचा विषय बनली  आहे. कधी लग्नाची बातमी, कधी नवऱ्याबाबतचा खुलासा तर आईची प्रकृती अशा विविध बातम्यांमुळे राखी नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिचे हे धक्कादायक खुलासे चर्चेत राहण्यासाठी केवळ पब्लिसिटी स्टंट आहेत की खरोखरच यामागे काही तथ्य आहे, हे नेहमी गुलदस्त्यातच राहिले आहे.
 
राखी सावंतबद्दल आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला अटक केली आहे. तिला सध्या आंबोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. काही वेळात अभिनेत्रीला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, १८ जानेवारी रोजी दिंडोशी न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता.
 
झाले असे की, अभिनेत्री शर्लिन चोपडाने राखी सावंत विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीत महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो वायरल केल्याचा आरोप शर्लिनने राखीवर केला होता. दरम्यान नोव्हेंबर २०२२ मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी चौकशीसाठी वारंवार बोलावल्यानंतरही राखी हजर न झाल्याने अखेर पोलिसांना तिला अटक करावे लागले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सत्र न्यायालयाने बुधवारी राखीची अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यानंतर आज तिला अटक करण्यात आली. तसेच पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.
 
दरम्यान, राखी सावंतच्या अटकेनंतर अभिनेत्री शर्लिन चोपडाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत ट्विट देखील केले आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, आंबोली पोलिसांनी राखी सावंतला एफआयआर ८८३/२०२२ प्रकरणी अटक केली. राखी सावंतचा ABA १८७०/२०२२ काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता.' 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.