चिंताजनक विमान दुर्घटना

    17-Jan-2023
Total Views |
 
plane crash
 (Image Source : Internet)
 
 
ऐन संक्रातीच्या दिवशी नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. नेपाळमधील प्रमुख शहारांपैकी एक असलेल्या पोखरा या शहराजवळ एक प्रवाशी विमान कोसळून (Plane Crash) झालेल्या अपघातात ६० हून अधिक प्रवाशांचा दुःखद अंत झाला. यती एअरलाईन्सच्या या विमानात नेपाळचे ५३, भारताचे ५, रशियाचे ४, कोरियाचे २ आयर्लंड, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, फ्रांसचे प्रत्येकी १ असे एकूण ७२ प्रवाशी होते. आतापर्यंत ६० हून अधिक प्रवासी मृत्यमुखी पडल्याची पुष्टी झाली आहे. अपघाताची भीषणता पाहता मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात जगभरातील प्रवासी असल्याने या अपघाताने जगभर शोककळा पसरली आहे.
 
विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतरच या अपघाताचे खरे कारण समोर येईल. असे असले तरी खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खरे तर उड्डाणापूर्वी प्रत्येक वैमानिकाला हवामानाचा अंदाज सांगितला जातो. या आधारावर तो आपली रणनीती ठरवतो. वातावरणाची दृष्यमानता कमी असेल तर वैमानिक उड्डाण करत नाहीत. अर्थात पर्वतीय भागात दृष्यमानता कमी असतेच. डोंगराची कमी, जास्त उंची असल्याने आणि सतत बदलणारे हवामान, धुके यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. मात्र अलीकडे अद्ययावत संगणक प्रणाली असल्याने विमान किती उंचावरून जात आहे, हवामानात काय बदल घडत आहे, याचा अंदाज वैमानिकांना येतच असतो. तरीही काही वैमानिक अतिआत्मविश्वासाने विमान उड्डाण करतात. हवामानाची पर्वा न करता स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात. या अपघातात हेच कारण आहे की आणखी काही दुसरे कारण आहे हे चौकशीत समोर येईलच पण ज्या प्रवाशांचा यात जीव गेला आहे, तो मात्र परत येणार नाही.
 
अलीकडे विमान अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नेपाळमध्ये हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अधिकच आहे. गेल्या १० वर्षात नेपाळमध्येच सर्वाधिक विमान अपघात झाले आहेत. त्यामुळे नेपाळच्या विमान वाहतूक सेवेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेपाळमध्येच नाही तर जगभर विमान अपघातांची संख्या चिंताजनकच आहे. भारतातही अलीकडे विमानात बिघाड झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीवरून बंगळुरुला जाणारे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. वैमानिकाने यशस्वी लँडिंग केल्याने सुदैवाने अपघात टळला. विमान उड्डाण करत असताना विमानातून ठिणग्या उडत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
 
काल देखील मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या विमानाचे असेच इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानाने वेळेत लँडिंग केल्याने पुढील अनर्थ टळला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. आपल्या देशात तर अनेक राजकीय आणि महनीय व्यक्ती विमान अपघातात गेले आहेत. संजय गांधी, माधवराव सिंधिया, जी एम सी बालयोगी हे त्यातील काही महत्वाची नावे आहेत.
 
मागील वर्षी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सिडीएस) जनरल बिपीन रावत यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. विमान अपघातात अशा मोठ्या व्यक्तींचे निधन होणे ही देशाची मोठी हानी आहे. केवळ मोठे सेलिब्रिटीज नव्हे तर सर्वसामान्य प्रवाशांचा जीव देखील तितकाच महत्वाचा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांसाठी तर विमान प्रवास हे स्वप्न असते आणि जर असे अपघात झाले तर त्या स्वप्नांचीच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचीच राखरांगोळी होते त्यामुळे असे अपघात होणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यायला हवी.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.