पोंगल : दक्षिण भारतीय लोकांचा उत्सव

    15-Jan-2023
Total Views |

Pongal Festival
(Image Source : Internet/ Representative image)
 
नागपूर :
भारतात वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव आणि सण साजरे करून नव्या वर्षाची सुरुवात केली जाते. एकीकडे उत्तर भारतात मकर संक्रांत आणि लोहरीचा उत्साह असतो, तर दक्षिण भारतात पोंगल (Pongal) उत्सव साजरा केला जातो. दक्षिण भारतात पोंगल उत्सवाला विशेष महत्व आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात १४-१५ तारखेला हा उत्सव साजरा केला जातो.
 
पोंगल हा तामिळ हिंदूंचा प्रमुख उत्सव आहे. पारंपारिकरित्या हा सण समृद्धीसाठी समर्पित आहे. यामध्ये पाऊस, सूर्यप्रकाश आणि शेतातील गुरेढोरांची समृद्धी आणण्यासाठी पूजा केली जाते. कोरोना महामारीनंतर यावर्षी हा सण थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. पोंगल सणाच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. हा उत्सव ४ दिवसांचा असतो. प्रत्येक दिवशी पोंगलला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पहिल्या दिवशी भोगी पोंगल, दुसऱ्या दिवशी सूर्य पोंगल, तिसऱ्या दिवशी मट्टू पोंगल आणि चौथ्या दिवशी कानू किंवा कान्नूम पोंगल साजरा केला जातो.
 
भोगी पोंगल :
या चार दिवशीय उत्सवाची सुरुवात भोगी पोंगलने होते. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. या दिवसाला 'इंद्रन' म्हणूनही ओळखले जाते. पोंगलच्या पहिल्या दिवशी लोक पहाटे उठून घराला स्वच्छ करतात. रात्री घरातील लाकूड आणि जुन्या वस्तूंना जाळून महिला त्याभोवती नृत्य करतात आणि गाणी गातात.
 
सूर्य पोंगल :
सूर्य पोंगलच्या दिवशी तामिळनाडूतील लोक एका मातीच्या भांड्याला हळदीचा तुकडा बांधून याला बाहेर सूर्यदेवासमोर ठेवतात. या भांड्यात तांदूळ व दुधाची खीर बनवून सूर्यदेवाला नैवेद्य लावला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते.
 
मट्टू पोंगल :
मट्टू पोंगलच्या दिवशी गाई-गुरांचे खूप महत्व असते. या दिवशी गाई-गुरांना, बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते. फुलांची माळ बनवून त्यांना घातली जाते. तामिळनाडूतील काही लोक या दिवशी 'जल्लीकट्टू' नावाचा खेळही खेळतात.
 
कान्नूम पोंगल :
पोंगलच्या शेवटच्या दिवशी कान्नूम पोंगल साजरा केला जातो. या दिवसाला 'तिरुवल्लूर दिवस' म्हणूनही ओळखले जाते. तामिळनाडूत तिरुवल्लूर नावाचे एक प्राचीन व प्रसिद्ध लेखक व कवी राहात होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यांनी लिहिलेले 'थिरुकुरल' हे पुस्तकही प्रसिद्ध झाले होते. या दिवशी तामिळनाडूतील लोक आप्तजनांच्या घरी जाऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी संपूर्ण परिवार एकत्रित येऊन हा दिवस उत्साहाने साजरा करतात. वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचा आनंद घेतात.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.