तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...!!!

    15-Jan-2023
Total Views |
 
makar sankranti spcial blog
 (Image Source : Internet/representative)
 
भारतीय संस्कृतीत सणांना अतिशय महत्व आहे. प्रत्येक सण विशिष्ट असा संदेश देत असतो. या सणातून एक वेगळीच प्रेरणा मिळत असते. मकर संक्रात हा त्यापैकीच एक सण. मकर संक्रात हा वर्षातील पहिला सण, त्यामुळे या सणाचा उत्साह काही निराळाच असतो. मकर संक्रांत हा सण संपूर्ण देशात वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात तर या सणाला खूप महत्व दिले जाते.
 
मकर संक्राती म्हणजे सूर्याने मकर राशीत प्रवेश करणे. सूर्य ज्या दिवशी दक्षीयणातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो, त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. ही तिथी कधी १४ जानेवारीला येते तर कधी १५ जानेवारीला येते. यावर्षी ही तिथी १५ जानेवारीला आली आहे. संक्रात ऐन थंडीत येते, त्यामुळे हवेत गारवा असतो. त्याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर होतो. त्यामुळे या दिवसात शरीराला उष्ण ठेवण्यासाठी उष्ण पदार्थ खाल्ले जातात. तीळ आणि गूळ यात उष्मांक अधिक प्रमाणात असतो. कदाचित त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटला जातो. संक्रातीच्या दिवशी तीळ आणि गूळ यांच्या वड्या किंवा लाडू एकमेकांना देण्याची पद्धत आहे. तिळगुळ देताना 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असा संदेशही दिला जातो.
 
एकमेकांविषयी स्निग्धता देणारे तीळ आणि गोडवा देणारा गूळ एकत्र आल्याने प्रेमाचे नाते टिकते, असे प्रतिकात्मक रूपही या सणाला आहे. एकमेकांशी असलेली कटुता भांडण विसरून, एकत्र येण्याचा संदेश देणारा हा सण आहे. मकर संक्रातील विवाहित स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू लावून सौभाग्याचे वान देतात. हे सर्व करण्यामागे कोणतीही रूढी परंपरा नसून नव्याने स्वागत आणि त्यातून आनंद घेणे हा आहे. पूर्वी स्त्रियांना एकत्र येण्याची संधी क्वचितच मिळत असे. या सणानिमित्त महिला एकत्र येत असे. आजच्या धकाधकीच्या जीवनातही महिलांना एकत्र येण्याची संधी क्वचितच मिळते त्यामुळे संक्रातीनिमित्त मिळणारी ही आयती संधी महिलावर्ग सोडत नाहीत.
 
मकर संक्रांत हा सण महिलांचा सण असे मानले जात असले, तरी लहान मुलेही या सणाची आतुरतेनं वाट पाहत असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. अनेक गावात पतंगोत्सव आयोजित केला जातो. या दिवशी आकाशात विविध रंगांची, आकाराची पतंगे उडताना दिसतात. पतंगाचे विविध आकार रंग पाहून मन प्रसन्न होते. एकमेकांशी असलेली कटुता विसरून प्रेमाने वागा असा संदेश देणारी मकर संक्रात म्हणजे आनंदाची पर्वणीच. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
 
 
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.