जर्मनीची ट्रम्प कंपनी महाराष्ट्रात करणार ३०० कोटींची गुंतवणूक

15 Jan 2023 12:23:33
- उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा फलदायी

Uday Samant Visited Trump Company of Germany
(Image Source : tw/@samant_uday)
 
स्टुटगार्ट :
राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला (Trump Company) भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनी पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
जर्मनी दौऱ्यात सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीच्या उत्पादन निर्मिती केंद्राला भेट दिली. यावेळी ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर आणि ट्रम्प इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पाटील यांनी सामंत यांचे स्वागत केले. बॅनम्युलर यांनी कंपनीच्या अत्याधुनिक लेझर कटिंग मशीन्स आणि फोल्डिंग मशीन्सचे सादरीकरण केले. वीजेवर चालणाऱ्या वाहनांच्या (EV) बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स तयार करण्यासाठी या मशीन्स वापरल्या जात आहेत. या मशीन्ससाठी ट्रम्प कंपनी महाराष्ट्रात निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक आहे. यासाठी सामंत यांनी कंपनीला महाराष्ट्र भेटीचे निमंत्रिण दिले असून त्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कंपनीचे प्रतिनिधी पुढील महिन्यात महाराष्ट्राला भेट देऊन स्थळ पाहणी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनी सुमारे ३०० कोटी रुपये गुंतवणूक करेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
लॅप केबल्स समूहाला भेट
उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी स्टुटगार्ट येथील लॅप काबेल समूहाला भेट दिली. यावेळी बार्डनचे संचालक आणि भारताचे वाणिज्य दूत अँड्रियास लॅप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लॅप यांनी ईव्ही चार्जिंग केबल्समधील नवीन तंत्रज्ञान आणि पोर्टेबल ईव्ही अडॅप्टरचे सादरिकरण केले. समृद्धी महामार्गावर या तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. उच्च दर्जाच्या तांब्याच्या धातुसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला भेट देण्याचे कंपनीला निमंत्रण देण्यात आले.
याचदरम्यान, इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने महाराष्ट्रात जर्मन कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि बार्डन वुर्टेमबर्ग यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अँड्रियास लॅप (बार्डन वुर्टेमबर्गचे भारताचे वाणिज्यदूत), थॉमस फुरमन (स्टुटगार्ट शहराचे उपमहापौर), जोहान्स जंग (आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे विभाग प्रमुख), सिमोन गोहरिंग (सल्लागार. बार्डन वुर्टेमबर्ग राज्य मंत्रालय), थॉमस मॅथ्यू (मर्सिडीज बेंझ), बर्नहार्ड ग्रीब (स्टुटगार्ट शहराच्या आर्थिक विकासाचे प्रमुख), खैलाश भट्ट (जर्मनीतील भारतीय वाणिज्य दूत), ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर, गेरहार्ड कुबलर (फ्रिट्झ कुब्लरच्या व्यवस्थापकीय संचालक) बार्बरा एफेनबर्गर (स्टटगार्टच्या कॉमर्स आणि इंडस्ट्री चेंबर) आणि जोएल मिटनाच्ट(भारतीय वाणिज्य दूतावासाच्या प्रमुख) आदी उपस्थित होते.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
Powered By Sangraha 9.0