नेपाळ प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त; ४० जणांचा मृत्यू

    15-Jan-2023
Total Views |

Aircraft crash at Pokhara Airport in Nepal
 (Image Source : Internet)
 
काठमांडू :
Aircraft crash in Nepal : नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. नेपाळच्या यती एअरलाईन्सचे एक प्रवासी विमान विमानतळाच्या धावपट्टीवर सकाळी ११ वाजताच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानात ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स असे एकूण ७२ जण होते. धक्कादायक बाब म्हणजे या विमान दुर्घटनेत आतापर्यंत ४० लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बचावकार्य सुरु असून सध्या विमानतळ बंद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यती एअरलाईन्सच्या ATR-७२ विमानाने रविवारी सकाळी काठमांडूहून पोखरासाठी उड्डाण केले होते. परंतु, कास्की जिल्ह्यातील पोखरामध्ये विमान कोसळले. अपघातानंतर बचावकार्य सुरू आहे. अपघाताबाबत माहिती देताना यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बारतौला यांनी सांगितले की, यती एअरलाईन्सच्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हे विमान कोसळले.
 
विमानाच्या अपघातानंतर या दुर्घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणात आगीचे आणि धुराचे लोट उठताना दिसत आहे. अशा परिस्थितीत बचावकार्य करण्यात अडचणी येत असल्याचेही दिसून येत आहे. अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. तसेच दुर्घटनाग्रस्त विमानात ५३ नेपाळी, ५ भारतीय, ४ रशियन, १ आयरिश, २ कोरियन, १ अर्जेंटिनी आणि १ फ्रेंच नागरिक विमानात होते, अशी माहिती विमानतळाच्या प्राधिकरणाने दिली आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.