धक्कादायक! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी

14 Jan 2023 18:17:16

union minister nitin gadkari
(Image Source : Internet)
 
नागपूर :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याबाबत शनिवारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नितीन गडकरी यांना चक्क जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गडकरी यांच्या नागपूरमधील खामला स्थित कार्यालयात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली. केवळ १० मिनिटांच्या कालावधीत दाऊदच्या नावाने धमकीचे लागोपाठ २ कॉल आहे. ही बातमी समोर येताच संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी देखील या प्रकरणाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
 
नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांना धमकी देणारे एकूण तीन कॉल आले. अज्ञात व्यक्तीने पाहिल्या १० मिनिटात लागोपाठ दोन कॉल केले. त्यानंतर तासाभराने पुन्हा एकदा कॉल करून धमकी दिली. पोलिस सध्या अज्ञात आरोपी कॉलरचा शोध घेण्यात गुंतले आहे. महत्वाचे म्हणजे धमकीचे कॉल करणाऱ्या व्यक्तीने दाऊद नावाने हे कॉल केले आहेत.
 
नागपूरचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या लँडलाइनवर बीएसएनएलकडून सकाळी ११.२५, ११.३२ आणि दुपारी १२.३२ वाजता धमकीचे तीन कॉल आले. कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवले जात आहेत. आमची गुन्हे शाखा सीडीआरवर काम करणार आहे. पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणानंतर नितीन गडकरी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांचे घर आणि कार्यालयासह त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
Powered By Sangraha 9.0