मानवी जीवनात भूगोलाचे महत्व अनन्यसाधारण

    14-Jan-2023
Total Views |

National Geography Day
 (Image Source : Internet/ Representative image)
 
 
आजचा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय भूगोल दिन (National Geography Day) म्हणून साजरा केला जातो. १४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो, हे खूपच कमी लोकांना माहिती आहे. भूगोल हा विषय आपण शालेय जीवनापासून शिकत आलो असूनही भूगोलाचे परिपूर्ण ज्ञान आपल्याला अजूनही मिळवता आले नाही. डॉ. सी. डी. देशमुख हे भूगोल विषयातील अत्यंत जाणकार व्यक्ती मानले जातात. त्यांचे भूगोलाचे ज्ञान अफलातून होते, त्यामुळे त्यांना भूगोल महर्षी असे म्हटले जाते. भूगोल महर्षी डॉ. सी. डी. देशमुख यांचा १४ जानेवारी हा जन्मदिवस. भूगोल विषयात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असे आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
भूगोल दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम साजरे केले जातात. भूगोल या शब्दाचा सरळ अर्थ पृथ्वीचा गोल असा होतो. भूगोल हा शब्द इंग्रजीतील Geography या शब्दासाठी पर्याय वापरला जातो. लॅटिन वरुन आलेल्या या शब्दाचा अर्थ 'भूवर्णन शास्त्र' पृथ्वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, क्रिया व आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे भूगोल असे स्थूलमानाने मानले जाते. भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांचा संबंध शोधणारे शास्त्र अशी देखील भूगोलाची व्याख्या केली जाते.
 
भूगोलाची तीन गटात विभागणी
१. प्राकृतिक भूगोल
२. मानवी भूगोल
३. प्रादेशिक भूगोल
 
प्राकृतिक भूगोलात भूरुप शास्त्र, हवामान शास्त्र, जैविक शास्त्र यांचा समावेश होतो. यासोबतच किनारी प्रदेश, खनिज शास्त्र आणि नैसर्गिक आपत्ती यांचाही प्राकृतिकभूगोलात समावेश होतो.
 
मानवी भूगोलात ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, आर्थिक व राजकीय भूगोलाचा समावेश होतो.
 
प्रादेशिक भूगोलात पर्यावरणाचे व्यवस्थापन आणि विविध संसाधन स्तोत्रांचे जनन व संवर्धन यांचा समावेश होतो.
 
भूगोलाच्या सखोल सविस्तर अभ्यासात विविध पद्धतींचा समावेश केला जातो. प्रत्यक्ष क्षेत्र निरीक्षण, नकाशे यांना तर भूगोलात महत्वाचे स्थान आहेच, पण आजकाल दुरसंवेदी कृत्रिम उपग्रह, ड्रोन कॅमेरे, हवाई चित्रीकरण यांनी भूगोलाच्या निरिक्षण क्षमतेत भर घातली आहे.
 
मानवी जीवनात भूगोलाचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपण जगतो ते जग त्याचे स्वरूप, विविध भूप्रदेश, देश, तेथील लोकजीवन यांचे ज्ञान आपल्याला भूगोलामुळेच होते.
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.