पाकिस्तान भिकेकंगाल

    13-Jan-2023
Total Views |

Food Shortage in Pakistan
(Image Source : Internet/ Representative image)
 
 
पाकिस्तान (Pakistan) सध्या भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली आहे. पाकिस्तानात महागाई २५ टक्क्यांनी वाढत आहे. पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तू विकत घेणे देखील मुश्किल बनले आहे. आपल्याकडे जो बिस्किटचा पुडा ५ रुपयांना मिळतो तो तिथे ५० रुपयांना मिळत आहे. खाद्यतेलाचा दर पोहोचलाय ८५० रुपयांवर.
 
पाकिस्तानमधील परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की दूध, ब्रेड यासारखे पदार्थ विकत घेणे देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पेट्रोल डिझेल तर केव्हाच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. १ किलो पीठ ४५० रुपयांना मिळत आहे, ते देखील सर्वांना मिळत नाही. ज्यांचा वशीला त्यांनाच हे पीठ मिळत आहे. त्यामुळे जनतेच्या संयमाचा बांध फुटत आहे. ज्या ठिकाणी पिठाच्या पिशव्या ठेवण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. या सर्व गोष्टींना पाकिस्तानमधील नागरिक कमालीचे वैतागले असून सरकार विरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी जनता रस्त्यांवर उतरत आहे.
 
नागरिक रस्त्यांवर उतरून सरकार विरुध्द रोष व्यक्त करताना म्हणत आहेत की, जर सरकार महागाई कमी करू शकत नसेल तर आम्हाला गोळ्या घालून ठार मारा. नागरिक रस्त्यांवर उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी करत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढत आहे. पाकिस्तानच्या शहाबाज शरीफ सरकारपुढे केवळ महागाई ही एकमेव डोकेदुखी आहे असे नाही, तर त्यापेक्षा मोठी डोकेदुखी शरीफ यांच्यासमोर उभी आहे ती म्हणजे देश चालवण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच शिल्लक नाहीत. पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीच्या साठ्यात केवळ ४१ हजार कोटी रुपये शिल्लक आहेत.
 
गेल्या ८ वर्षातील हा सर्वाधिक नीचांक आहे. देश चालवण्यासाठी पाकिस्तानकडे पैसाच नसल्याने पाकिस्तानकडे इतर देशांकडे भिकेचा कटोरा घेऊन जाण्यासाठी पर्याय नाही. मात्र पाकिस्तानवर आज इतके कर्ज आहे की त्यांना कर्ज देण्यास कोणीही तयार नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने पाकिस्तानला कर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या नजरा केवळ चीन आणि सौदी अरेबियावर खिळल्या आहेत. ५ जानेवारी २०२३ रोजी द गार्डीयन मध्ये लिहिलेल्या लेखात पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी जगभरातील देशांना पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.
 
पाकिस्तानचे एक मंत्री इशाक दर यांनी सौदी अरेबियाकडे मदतीची याचना केली आहे. सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला अधिक आशा आहे. कारण मागील वर्षी म्हणजे मे २०२२ मध्ये सौदी अरेबियाने ८ अब्ज डॉलरची आर्थिक मदत केली होती. यावर्षी ही मदत दुपटीने वाढवावी, अशी गळ पाकिस्तानने सौदी अरेबियाला घातली आहे. चीनकडूनही पाकिस्तनाला मदतीची अपेक्षा आहे. चीनने अद्याप मदतीची घोषणा केली नसली तरी चीन पाकिस्तनचे संबंध पाहता चीन पाकिस्तनाला आर्थिक मदत करेल. मात्र ही मदत आणखी किती काळ मिळेल? हा प्रश्न आहे. कारण पाकिस्तान आर्थिक मदत तर घेते पण त्याची परतफेड मात्र करत नाही. म्हणूनच अमेरिका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने त्यांना आर्थिक मदत देणे थांबवले आहे.
 
अमेरिकेने त्यांना कर्ज देणे थांबवले असले तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानला तुटपुंजी मदत केली आहे. मात्र यापुढे मदत मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. पाकिस्तानची परिस्थिती ही त्यांनीच ओढवून घेतली आहे. जन्मापासून हा देश दुसऱ्याच्या तुकड्यावर जगत आला आहे. इतर देशांकडून आर्थिक मदत घ्यायची आणि ती मदत पाकिस्तानच्या विकासावर खर्च करण्याऐवजी दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी खर्च करायची. नागरिकांच्या नावाने घेतलेले पैसे पाकिस्तानने दहशतवाद्यांना दिले. दहशतवाद वाढवला त्यामुळे परदेशी कंपन्या पाकिस्तानात येत नाहीत.
 
परकीय गुंतवणूक नाही त्यामुळे विकास नाही आणि विकास नाही म्हणून देश भकास अशी पाकिस्तानची परिस्थिती आहे. मात्र पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना त्याचे काहीही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. पाकिस्तनाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याऐवजी पाकिस्तानचे नेते भारतावर टीका करण्यात मश्गुल आहेत. बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली टीका यातून सिद्ध झाले आहे. अर्थात भारत पाकिस्तानच्या टीकेला भीक घालत नाही. भारतावर टीका करण्यापेक्षा पाकिस्तानच्या नेत्यांनी त्यांच्या देशातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यावर भर द्यावा, नाहीतर पाकिस्तान आणखी भिके कंगाल होईल.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.