केंद्राची मोठी कारवाई! बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या 'या' यूट्यूब चॅनल्सवर बंदी

    12-Jan-2023
Total Views |

Banned YouTube Channels
(Image Source : tw/@PIB_India)
 
 
नवी दिल्ली :
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Information and Broadcasting Ministry) समन्वयाने काम करून भारतात खोटी माहिती पसरवत असलेल्या सहा यूट्यूब चॅनल्सवर कारवाई केली आहे. हे यूट्यूब चॅनल्स खोट्या बातम्या पसरवत असल्याचा पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या चॅनल्सद्वारे पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी १०० हून अधिक तथ्य-तपासण्यांचा समावेश असलेल्या ६ वेगवेगळ्या ट्विटची मालिका फॅक्ट चेक कक्षाने जारी केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलेल्या या कक्षाची ही अशा प्रकारची ही दुसरी कारवाई आहे. या कारवाईच्या माध्यमातून संपूर्ण वाहिन्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
 
नेशन टीव्ही, सरोकार भारत, नेशन २४, संवाद समाचार, स्वर्णिम भारत, संवाद टीव्ही या सहा वाहिन्यांवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कारवाई केली आहे. या ६ ही युट्यूब वाहिन्या एका समन्वित अपप्रचार नेटवर्कचा भाग म्हणून कार्यरत असल्याचे आढळले. महत्वाचे म्हणजे या वाहिन्यांची सदस्यसंख्या जवळपास २० लाख होती आणि त्यांच्या व्हिडिओंना ५१ कोटींहून अधिक वेळा पाहिल्या गेले आहे.
पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने कारवाई केलेल्या यूट्यूब चॅनल्सनी निवडणुका, सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या संसदेतील कार्यवाही, भारत सरकारचे कामकाज इत्यादींबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील बंदीबाबत खोटे दावे आणि भारताचे राष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश यांच्यासह वरिष्ठ घटनात्मक अधिकाऱ्यांची बनावट विधाने दाखवणे याचा यात समावेश आहे.
बनावट बातम्यांच्या आधारावर कमाई करणाऱ्या हे चॅनल्स बनावट बातम्यांच्या अर्थव्यवस्थेचा भाग आहेत. प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी आणि या बातम्या खऱ्या आहेत यावर प्रेक्षकांचा विश्वास बसावा, तसेच कमाई करण्याच्या दृष्टीने, या चॅनल्सद्वारे प्रसारित व्हिडिओजच्या माध्यमातून, चॅनलवर प्रेक्षक संख्या वाढावी यासाठी या वाहिन्या बनावट, क्लिकबेट आणि सनसनाटी लघुप्रतिमा (थंबनेल) आणि दूरचित्रवाहिन्यांवरील वृत्त निवेदकाच्या प्रतिमा वापरत होत्या.
पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने केलेली ही अशाप्रकारची दुसरी कारवाई आहे. यापूर्वीच्या एका मोठ्या कारवाईत २० डिसेंबर २०२२ रोजी या कक्षाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या तीन वाहिन्यांचा पर्दाफाश केला होता.
 
 
 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.