धर्मभास्‍कर रथयात्रेने रेशीमबाग परिसर दुमदुमला; संत, महंत, आचार्यांचे भव्‍य स्‍वागत

11 Jan 2023 13:46:25
- हजारोंच्या संख्येने उपासकांचा सहभाग

Dharmabhaskar Rath Yatra 
 
नागपूर :
संकेश्वर पीठाचे जगद्गुरु पूज्यपाद शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांनी जाहीर केलेला 'धर्मभास्कर' (Dharmabhaskar) हा सन्मान प.पू. सद्गुरूदास महाराज यांना बुधवारी प्रदान केला जाणार आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर श्री गुरुमंदिर नागपूर प्रणित स्‍वामी विष्‍णुदास स्‍वामी महाराज अध्‍यात्‍म केंद्राच्या वतीने काढण्‍यात आलेल्‍या भव्‍य धर्मभास्‍कर रथयात्रेने मंगळवारी रेशीमबाग परिसर दुमदुमला. महाराष्‍ट्र, गुजरात अशा विविध राज्‍यांतून आलेल्‍या हजारो उपासकांनी रथयात्रेत सहभाग नोंदवला.
 
व्हीनस स्पोर्ट्स असोसिएशन मैदानावरून या भव्य रथयात्रेला प्रारंभ झाला. अग्रभागी असलेल्‍या अश्‍वारूढ धर्म ध्‍वज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व त्‍यांच्‍या मागोमाग येणाऱ्या शिवकालीन मर्दानी खेळ व भगवे फेटे आणि धर्मध्‍वज घेतलेल्‍या 50 उपासकांनी रथयात्रेचे नेतृत्‍व केले. फटाक्‍यांची आतीषबाजी, शंखनाद, लेझीम, ढोलताशाच्‍या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. परिसरातील नागरिकांनी अंगणात सडा, रांगोळ्या काढून रथयात्रेचे मंगलमय स्‍वागत केले.
 
Dharmabhaskar Rath Yatra
 
रथेयात्रेत संतांचे पाच रथ सहभागी झाले होते. पहिल्‍या रथात कर्नाटकामधील कंपाली पीठाचे आचार्य नारायणविद्या भारती, बीडचे अमृताश्रम महाराज विराजमान होते तर दुसऱ्या रथात प.पू. विष्‍णूदास महाराजांची प्रतिमा ठेवण्‍यात आली होती. या रथात प.पू. सद्गुरूदास महाराज विराजमान झाले होते. अन्‍य तीन रथांमध्‍ये प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर (पाथर्डी, अहमदनगर), बाबामहाराज तराणेकर (इंदौर), ह.भ.प. गोविंद महाराज (पाथर्डी), दत्तगिरी महाराज (मरडसगाव ), योगी कालिदास महाराज (गुंज, परभणी),  बब्रू महाराज (तेलंगणा), अवधूत गिरी महाराज (उत्तरप्रदेश), नागेशशास्त्री अंबुलगे नंदी महाराज (तुळजापूर), ह.भ.प.भागवत महाराज (लखनौ), श्रध्देय राधिकानंद सरस्वती (पुणे), राहुल फाटे (नाशिक), छोटे बालकदास माहात्यागी महाराज (धर्मापुरी-वय१००वर्षे), हिमालय योगी सदानंदगिरी महाराज (वय १०७वर्षें), भगिरथी महाराज (नागपूर) यांची उपस्थिती होती.

Dharmabhaskar Rath Yatra 
 
रथयात्रा सर्वेश्‍वर हनुमान मंदिर, श्री दत्त दरबार मार्गे डॉ. हेडगेवार पथ, वटेश्‍वर हनुमान मंदिर, श्री गजानन चौक, महाराजा मॉल मार्गे जात परत व्‍हीनस स्‍पोर्टस मैदानात विसर्जित करण्‍यात आली. गडचिरोली, ब्रम्‍हपुरी, पुणे, तेल्‍हारा, अकोला, भांबेरी, गाडेगाव, दानापूर, लाखनी, भंडारा, चंद्रपूर, भद्रावती, आमगाव, वणी, बासर, नांदेड यासह गुजरातेतून आलेले वादक, उपासक रथयात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रथयात्रेचे समालोचन श्रद्धा भारद्वाज व स्‍वाती हुद्दार यांनी केले.

Dharmabhaskar Rath Yatra
 
आज सद्गुरुदास महाराजांना 'धर्मभास्कर' सन्मान प्रदान सोहळा
संकेश्वर पीठाचे जगद्गुरु पूज्यपाद शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांनी जाहीर केलेला 'धर्मभास्कर' हा सन्मान आज 11 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता सद्गुरुदास महाराज यांना प्रदान केला जाणार आहे. रेशीमबाग येथील सुरेशभट सभागृह येथे होणाऱ्या या सोहळ्याला राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे. यावेळी अनेक संत महंत योगी, वे.शा.संपन्न महानुभाव तसेच ठिकठिकाणाहून आलेले हजारो उपासक उपस्थित राहतील. दरम्‍यान, सकाळी 11 वाजता पत्रभेट प्रकाशनतर्फे 'धर्मभास्कर' गौरविकेचे प्रकाशन केले जाणार असून अध्‍यक्षस्‍थानी ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. म.रा. जोशी राहतील. हा कार्यक्रम रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला मुकुंदकाका जाटदेवळकर, अमृताश्रम स्‍वामी यांची उपस्‍थ‍िती राहणार आहे.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
Powered By Sangraha 9.0