घरबसल्या दस्त नोंदणीसाठी ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा वापर

    01-Jan-2023
Total Views |

e-registration
image source internet
 
नागपूर,
 
नोंदणी व मुद्रांक विभागाने जनतेला गतिमान सेवा देण्यासाठी ई-रजिस्ट्रेशन प्रणाली विकसित केली असून, त्याद्वारे घरबसल्या किंवा बांधकाम व्यावसायीकाचे कार्यालयामध्ये दस्त नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी केले.
अशाप्रकारची ई-रजिस्ट्रेशन प्रणाली उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून, त्यासाठीचा ई-गव्हर्नन्स 2022 राष्ट्रीय पारितोषीक सुवर्णपदकाचे मानकरी मुद्रांक व नोंदणी विभागाचे नोंदणी महानिरिक्षक श्रावण हर्डीकर व त्यांचे पथक ठरलेले आहे. हा पुरस्कार 26 नोव्हेंबर रोजी, जम्मु काश्मीरच्या कटरा येथे पार पडलेल्या परिषदेमध्ये देण्यात आला.
ई-रजिस्ट्रेशन प्रणालीची माहिती व्हावी यासाठी नुकताच चिटणविस सेंटर, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे नोंदणी महानिरीक्षक  हर्डीकर यांचे अध्यक्षतेखाली प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबीरासाठी मोठया प्रमाणावर वकील मंडळी, क्रेडाईचे सभासद व एएसपी हजर होते. याप्रसंगी नोंदणी महानिरीक्षक हर्डीकर यांनी ई-रजिस्ट्रेशन प्रणाली विषद करुन नागरिकांना त्यांचे सोयीचे ठिकाणी, कोणत्याही दिवशी व कोणत्याही वेळी दस्त नोंदणीसाठी सादर करता येईल, असे प्रतिपादीत केले. तसेच, या प्रणालीच्या अनुषंगाने व विभागातील कामकाजासंबंधी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन अडीअडचणींचे निराकरण हर्डीकर यांनी केले.
कोणाला घेता येणार लाभ
ज्या बांधकाम व्यावसायीकाकडे नियमानुसार सर्व परवानग्या उपलब्ध आहेत व रेरा रजिस्ट्रेशन आहे असे बांधकाम व्यावसायीक, सदनिकेच्या प्रथम विक्री करारनामा नोंदणीसाठी या प्रणालीचा वापर करु शकतात. या प्रणालीमूळे विक्रेता बांधकाम व्यावसायीक व खरेदीदार यांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज नाही. या प्रणालीद्वारे कोणत्याही दिवशी व कोणत्याही वेळी दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सादर करणे शक्य झाल्यामूळे नागरिकांचा बहुमूल्य वेळ व श्रमाची बचत होणार आहे.