(image source: internet)
मुंबई:
देशातील ख्यातनाम उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. पालघरमध्ये सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला. सायरस मिस्त्री यांची कार रस्ता दुभाजकाला धडकली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची वार्ता येताच विविध स्तरातून शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे.
सायरस मिस्त्री यांनी शापूरजी पालोनजी अँड कंपनीचे संचालक होते. तसेच ते टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचेही ते नातेवाईक आहेत. त्यांच्या एका बहिणीचा विवाह रतन टाटा यांच्या सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाला होता.
सायरस मिस्त्री हे सप्टेंबर 2006 रोजी टाटा सन्सच्या संचालक मंडळावर रुजू झाले होते. सायरस मिस्त्री हे २०१३ साली टाटा समूहाचे अध्यक्ष नेमण्यात आले होते.
त्यावेळी ते टाटा समूहाच्या टाटा इंडस्ट्रीज, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा टेलिसर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स, ग्लोबल बेव्हरेजेस आणि टाटा केमिकल्स यांचे ही ते अध्यक्ष राहिले होते. 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा समूहाच्या बोर्ड सदस्यांनी सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले आणि त्यानंतर टाटा समूहाच्या बोर्ड सदस्यांनी रतन टाटा यांना पुन्हा एकदा अध्यक्ष बनवले होते.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अपघाताबाबत सखोल चौकशी करणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशी प्रतिक्रया ट्विटरच्या माध्यमांतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
तसेच पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलिस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत सांगितले आहे.