जुबली स्टार आशा पारेख!

    29-Sep-2022
Total Views |

asha parekh(image source : internet) 
 
हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख याना यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके हा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असून हिंदी चित्रपट सृष्टीचा नावलौकिक वाढवण्यासाठी ज्यांनी अतुलनीय काम केले अशा महान कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. आशा पारेख यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने एका योग्य कलाकाराला हा पुरस्कार मिळाल्याची भावना चित्रपट रसिकांमध्ये निर्माण झाली आहे कारण आशा पारेख या हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक यशस्वी कलाकारांपैकी एक आहेत.
 
विशेषतः १९५९ ते १९७५ या काळात त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. १९७१ साली आलेल्या 'कटी पंतग' या चित्रपटाने तर इतिहास रचला. त्यावर्षीचा तो सर्वाधिक गाजलेला चित्रपट होता. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअरचा 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार' मिळाला होता. १९५९ साली आलेल्या 'दिल देके देखो' या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत प्रवेश केलेल्या
 
आशा पारेख यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४२ रोजी गुजरात मधील महुआ या गावात झाला. त्यांचे वडील हिंदू तर आई मुस्लिम होत्या. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या आशाजींनी वयाच्या दहाव्या वर्षी एका चित्रपटात बाल कलाकार म्हणून भूमिका केली. आशा पारेख या लहान असताना स्टेज शो मध्ये भाग घेत. अशाच एका स्टेज शो मध्ये अभिनय करताना बिमल रॉय या त्या काळातील प्रसिद्ध दिग्दर्शकांनी त्यांना पाहिले त्यांच्या अभिनयाने त्यांना प्रभावित केले आणि त्यांनी आशा पारेख यांना 'बाप बेटी' या चित्रपटात भूमिका दिली. अर्थात ही भूमिका नायिकेची नसली तरी या भूमिकेसाठी त्यांनी जी मेहनत घेतली ती पाहून अनेक निर्माते दिग्दर्शकांनी त्यांना त्यांच्या चित्रपटात भूमिका करण्यासाठी गळ घातली मात्र त्यांनी मोजक्याच पण दर्जेदार भूमिका असलेल्या चित्रपटात काम केले.
 
त्यांच्या सर्व भूमिका प्रेक्षकांना पसंत पडल्या. त्यांनी नायिका म्हणून भूमिका केलेले जब 'प्यार किसीसे होता है', 'घराना', 'छाया', 'फिर वही दिल लाया हु', 'जिद्दी', 'मेरे सनम', 'तिसरी मंजिल', 'लव इन टोकियो', 'आये दिन बहार के',' उपकार', 'महल', 'कन्यादान', 'आया सावन झुमके', 'आन मिलो सजना', 'नया रास्ता', 'कटी पंतग',' मेरा गाव मेरा देश', 'राखी', 'आंदोलन' हे चित्रपट खूप लोकप्रिय झाले. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी दाद दिली. यातील काही चित्रपट ५० आठवड्यांपर्यंत चालले म्हणून प्रेक्षक त्यांना जुबली स्टार असे संबोधू लागले. राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांचे अनेक चित्रपट असले तरी शम्मी कपूर, शशी कपूर, देवानंद, अशोक कुमार, सुनील दत्त, राजेंद्र कुमार यांच्यासोबतही त्यांनी काम केले. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे. त्यांच्या अभिनय कलेची दखल घेऊन १९९२ सालीच भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले. आता दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कलेचे खऱ्या अर्थाने चीज झाले असे म्हणावे लागेल. या पुरस्काराबद्दल आशा पारेख यांचे मनापासून अभिनंदन!
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.