आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार!

22 Sep 2022 12:22:55

karmaveer bhaurao patil (Image Source : tw/@supriya_sule)
 
 
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा पोहोचवून, ज्ञानाचा दिवा घरोघरी प्रज्वलित करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा २२ सप्टेंबर हा जन्मदिन. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीमध्ये सक्रिय असणाऱ्या भाऊरावांची शिक्षणाने पोषण, बुद्धिवादाने रूढिवादाचा अंत, समतेने विषमतेचे निर्मूलन आणि श्रमाला प्रतिष्ठा ही तत्वप्रणाली होती. कर्मवीरांचे जीवन म्हणजे एक विद्यापीठ असून, जीवनात कोणतीही गोष्ट फुकट नको यासाठी ‘कमवा आणि शिका’ योजना राबवून लाखो गरीब मुलांमध्ये स्वाभिमान निर्माण करणारे आणि ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ मानून शिक्षणाचा प्रसार करणारे कर्मवीर खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. आपल्या सामाजिक - शैक्षणिक कार्याने संत गाडगे महाराजांना प्रभावित करणाऱ्या कर्मवीरांनी ‘प्रत्येक खेड्यात शाळा असली पाहिजे. विना शाळेचे एकही गाव महाराष्ट्रात असू नये. प्रत्येक नांगरापाठीमागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे’ हे स्वप्न बाळगले आणि ते प्रत्यक्षात उतरविले देखील.
 
कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली व तेथे भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.
कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते. तर आईचे नाव गंगाबाई. कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री हे मूळ गाव असणाऱ्या कर्मवीर यांचे पूर्वज नशीब आजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. ऐतवडे (जि. सांगली) येथे स्थिर झाल्यानंतर त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली. त्यामुळे त्यांचे पूर्वीचे आडनाव देसाई हे नाव बदलले जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यातील बाहुबलीच्या डोंगरावर पार्श्वनाथ यांचे सुंदर भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत वसलेल्या कुंभोज या छोट्याशा गावी त्यांचा २२ सप्टेंबर १८८७ रोजी अश्विन शुद्ध पंचमी (ललित पंचमी) ला कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज येथेच गेले.
 
भाऊरावांच्या आईला शिवाशिव चालत नसे. एवढे कर्मठ घराणे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. बालपणी ते कुंभोज मधील अस्पृश्य मुलांच्यात खेळले असल्याने त्यांना अस्पृश्यतेबद्दल मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही, म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावात झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.
यापुढील काळात भाऊराव पाटील सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात दुधगाव शिक्षण मंडळ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वस्तीगृह ही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला. स्वातंत्र्य चळवळीसाठी हजारो कार्यकर्ते तयार करणाऱ्या महाराष्ट्राच्या समाजपरिवर्तनाच्या चळवळींच्या या ज्ञानदूतास विनम्र अभिवादन!!
 
 
प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ, सांगली
९४२३८२९११७

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
 
Powered By Sangraha 9.0