हुरहूर लावणारी निवृत्ती

    18-Sep-2022
Total Views |
 

roger federer( image source : internet) 
 
 
मागील आठवड्यात महिला टेनिसची अनभिक्षित सम्राज्ञी सेरेना विल्यम्स हिने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारली. आता पुरुष टेनिसचा बादशहा स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर यानेही व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली आहे. एकापाठोपाठ एक अशा दोन महान खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारल्याने टेनिस रसिकांचा मोठा हिरमोड झाला आहे. असे असले तरी तो निवृत्ती घेणार याची जाणीव टेनिसप्रेमींना झाली होती. कारण प्रत्येकाला केव्हा ना केव्हा आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम द्यावाच लागतो. रॉजर फेडरेरने तो दिला आहे, मात्र त्याची कारकीर्द संपली असली तरी टेनिस विश्वात तो एक महान खेळाडू म्हणूनच कायम ओळखला जाणार आहे. कारण त्याने त्याच्या कारकिर्दीत जी दैदिप्यमान कामगिरी केली आहे, ती अतिशय थोड्या खेळाडूंना करता आली आहे.
 
जिमी कॉर्नर्स, जॉन मेकॅनरो, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, पिट सॅमप्रस, आंद्रे अगासी या खेळाडूंची नावे महान खेळाडूंच्या पंक्तीत घेतली जातात. आता रॉजर फेडररचे नावही त्या पंक्तीत घेतले जाते. रॉजर फेडररने जेव्हा व्यावसायिक टेनिस खेळायला सुरुवात केली तेव्हा पिट सॅमप्रस याचा बोलबाला होता. विशेषतः विम्बल्डनचा तो सम्राट मानला जायचा. रॉजर फेडरेरने अवघ्या २१ व्या वर्षी पिट सॅमप्रसचा पराभव करून विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले, तेव्हा अनेकांनी तोंडात बोटे घातली. त्या स्पर्धेत त्याने जी चुणूक दाखवली ती पाहून अनेकांनी भविष्यात तो सॅमप्रसची जागा घेईल, असे भाकीत केले. रॉजर फेडरेरने लवकरच ते भाकीत खरे केले.
 
सॅमप्रस हा विम्बल्डनचा सम्राट मानला जात असला तरी इतर ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याची कामगीरी यतातथाच राहिली आहे. रॉजर फेडरेरने मात्र विम्बल्डनसह अमेरिकन, ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपनमध्येही विजेतेपद मिळवत आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले आहे. रॉजर फेडरेरने तब्बल ८ वेळा विम्बल्डनचे वीजतेपद पटकवले असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव पुरुष टेनिसपटू आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन ओपन ६ वेळा, अमेरिकन ओपन ५ वेळा तर फ्रेंच ओपन एकदा जिंकण्याची करामत केली आहे. रॉजर फेडररचे प्रतिस्पर्धी राफेल नदाल आणि नोव्हाक जोंकोविच यांनी फेडररपेक्षाही जास्त ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असल्या तरी टेनिसप्रेमींना त्या दोघांपेक्षा फेडररचा खेळ पाहणे जास्त आवडायचे. त्याच्या सामन्याला सर्वाधिक गर्दी जमायची. त्याचा नजाकतभरा खेळ पाहण्यासाठी टेनिसपटू गर्दी करत.
 
टेनिस विश्वातील सर्वाधिक नजाकतदार खेळाडू कोण असेल तर तो रॉजर फेडरर हाच आहे. त्याची सर्व्हिस, व्हॅली, फॉरहँड, बॅकहँड सर्वच फटके नजाकतपूर्ण असायचे. रॉजर फेडरर हा सर्वाधिक चाहते लाभलेला टेनिसपटू आहे. म्हणूनच त्याने आपल्या उत्पादनाची जाहिरात करावी यासाठी मोठमोठ्या कंपन्या त्याच्यासोबत करार करण्यास उत्सुक असायच्या. वयाच्या ३६ व्या वर्षी एका वस्त्र निर्माण करणाऱ्या कंपनीने त्याच्यासोबत ३०० दशलक्ष डॉलरचा करार केला होता. त्यावेळी हा सर्वाधिक रकमेचा करार मानला गेला होता.
 
सुरुवातीला रॉजर फेडरर हा अतिशय गरम डोक्याचा खेळाडू होता. त्याला राग आल्यानंतर तो रॅकेट फेकून द्यायचा, सामना हरल्यानंतर मोठमोठ्याने ओरडायचा. त्याच्या पत्नीने आणि चाहत्यांनी त्याला समजवल्यानंतर त्याने आपला स्वभाव बदलला, त्याचा फायदा त्याला झाला. त्याने खेळावर लक्ष केंद्रित केले आणि लवकरच तो जगातील नंबर १ चा टेनिसपटू बनला. तब्बल ३१० आठवड्यापर्यंत तो जगातील नंबर १ चा खेळाडू होता. मधल्या काळात त्याला दुखापतीने घेरले पण त्याने हार मानली नाही. दुखापतीवर मात करून तो पुन्हा कोर्टवर उतरला. त्याची हीच जिद्द टेनिसप्रेमींनी भावली. आता त्याने निवृत्ती स्वीकारली असल्याने पुन्हा कोर्टवर उतरणार नाही. त्यामुळे त्याचा नजकातदार खेळ पाहायला मिळणार नाही, याची हुरहूर टेनिसप्रेमींना लागली आहे.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.