पंतप्रधानांची देशवासियांना खास भेट; सात दशकांनंतर ८ चित्ते भारतात

    17-Sep-2022
Total Views |

cheetah
(Image Source : tw/@narendramodi)
 
श्योपूर :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी आपल्या जन्मदिनी देशवासियांना एक खास भेट दिली आहे. तब्बल सात दशकांच्या मोठ्या कालावधीनंतर चित्ते आज भारतात परतले आहेत. 'प्रोजेक्ट चीता' अंतर्गत आज मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात (Kuno National Park) 8 चित्ते सोडण्यात आले.
 
 
नामिबियातून 'स्पेशल प्लेन'ने भारतात आणलेल्या या ८ चित्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कुनो अभयारण्यात सोडण्यात आले असून आजचा दिवस ऐतिहासिकदृष्ट्या संस्मरणीय आहे.देशभरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासोबतच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात आज तो ऐतिहासिक क्षण आला आहे, जेव्हा श्योपूरच्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यात ८ चित्ते सोडण्यात आले आहे. चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यासाठी पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील भारतीय हवाई दलाच्या विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांचे स्वागत केले.
१९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाला होता आणि आज तब्बल ७० वर्षांनंतर म्हणजेच ७ दशकांनंतर हा ऐतिहासिक दिवस आला आहे. चित्त्यांनी भारतात पाऊल ठेवल्यानंतरचे खास क्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक असल्याचेही ते म्हणाले.
 
 
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'आम्ही १९५२ मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याचे जाहीर केले होते, परंतु अनेक दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही अर्थपूर्ण प्रयत्न झाले नाहीत हे दुर्दैव आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशात चित्यांच्या पुनर्वसनाला नव्या ऊर्जेने सुरुवात झाली आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण झाले तर आपले भविष्यही सुरक्षित राहील, हे खरे आहे. विकास आणि समृद्धीचे मार्गही खुले होतात. जेव्हा कुनो राष्ट्रीय अभयारण्यात चित्ते पुन्हा धावतील, तेव्हा येथील गवताळ प्रदेशाची स्थिती चांगली होईल.
 
 
पंतप्रधानांनी मानले नामिबिया सरकारचे आभार
भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरद्वारे ८ चित्त्यांना ग्वाल्हेर ते मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणून मग सोडण्यात आले. या ८ चित्तांसाठी कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये एक खास परिसर तयार करण्यात आला आहे. नामिबियाहून त्यांच्या आगमनानंतर चित्त्यांना काही काळ वेगळे ठेवण्यात येईल. या अनमोल वारशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबिया सरकारचे आभार मानले आहेत. 'आजचा ऐतिहासिक क्षण नामिबियाच्या सरकारशिवाय शक्य झाला नसता,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
५ वर्षांत चित्यांची संख्या ५० पर्यंत वाढणार
नामिबियातून भारतात आणलेल्या ८ चित्त्यांपैकी पाच मादी आणि तीन नर आहेत. एनजीओ चीता कन्झर्वेशन फंड (CCF) ने सांगितले की, त्यापैकी पाच मादी चित्ता २ ते ५ वर्षे वयोगटातील आणि तीन नर चित्ता ४.५ ते ५.५ वर्षे वयोगटातील आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यात हे चित्ते भारतातील लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे पुनरुज्जीवन करण्यात भागीदार असतील.
दरम्यान, नोव्हेंबर २०२१ मध्ये चित्ते भारतात येणार होते. परंतु, कोरोना महामारीमुळे ही प्रक्रिया लांबली. आता सुरुवातीला ८ चित्ते कुनो येथे पोहोचले आहेत. येत्या ५ वर्षांत चित्तांची संख्या ५० पर्यंत वाढेल. याचाच अर्थ या प्रक्रियेतून आणखी अनेक चित्ते भारतात येणे निश्चित आहे.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.