उत्तरप्रदेशात पावसाचा कहर; भिंत कोसळल्याने ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    16-Sep-2022
Total Views |

wall collapsed in lucknow
 (Image Source : Internet)
 
लखनऊ :
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने उत्तरप्रदेशात सध्या कहर केला आहे. येथे संततधार पावसामुळे जीर्ण झालेल्या जुन्या इमारती किंवा इमारतीचा भाग कोसळल्याच्या अनेक घटना घडत आहे. यामुळे दुर्दुवाने आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली आहे. याशिवाय १० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
लखनऊ आणि कानपूर भागात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कच्ची घरे आणि भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लखनऊमध्ये कॅन्टमधील दिलखुशन कॉलनीत भीषण दुर्घटना घडली. येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत कोसळल्याने ९ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये तीन पुरुष, तीन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
उन्नाव येथील असोहा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कंठा गावात मुसळधार पावसामुळे एका मातीच्या घराची छत कोसळल्याने चार जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. यामुळे कुटुंबातील दोन भाऊ आणि बहिणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आई जखमी झाली आहे. तसेच रायबरेलीतील कोतवाली भागातील मरैयापूरमध्ये एका घराची खोली कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ५ जण अडकून पडले. या घटनेत नवजात बालकाचा गुदमरल्याने मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
याशिवाय कानपूरमधील जुही खलवा अंडरपासमध्ये भरलेल्या पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच फतेहपूर जोनिहान शहरात एका ७० वर्षीय वृद्धाचा गुरांच्या गोठ्याची छत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. तर झाशीतील दोन मजली घर कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून ढिगाऱ्याखाली अडकल्याने ३ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तरप्रदेशात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केला आहे. तसेच योजी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ट्विट करून म्हणाले की, लखनऊमध्ये भिंत कोसळून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने मला खूप दु:ख झाले आहे. या अपघातात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. यासोबतच या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, अशी मी प्रार्थना करतो.
 
 
पुढे ते म्हणाले, मला स्थानिक प्रशासनाकडून या अपघाताबाबत अधिक माहिती मिळाली आहे. प्रशासन मदत आणि बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्यात येत आहेत. मी पुन्हा त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.
 
 
याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ट्विट करून लखनऊ जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, प्रिय राज्यवासियांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी घाबरू नका. तुमचे सरकार प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत आहे. जीवितहानीमुळे बाधित कुटुंबांना तसेच ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, जनावरांना इजा झाली आहे त्यांना तात्काळ स्वीकार्य आर्थिक मदत देण्याचे तसेच पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले आहेत. स्वतःची, आपल्या प्रियजनांची आणि ज्येष्ठांची काळजी घ्या.
 
 
याशिवाय राज्यातील घडलेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुकँबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले असून जखमींवर योग्य उपचार करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.