कोल्हापूरचे नामवंत संख्याशास्त्रज्ञ : डॉ. वसंत शंकर हुजुरबाजार!

    15-Sep-2022
Total Views |
 
dr vasant shankar hujurbazaar (Image Source : Internet)
 
 
आज महाराष्ट्राचे ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ, संख्याशास्त्राचे प्रसारक डॉ. वसंत शंकर हुजुरबाजार यांचा जन्मदिन. मूळ गणिताचे विद्यार्थी असलेल्या हुजुरबाजार यांनी संख्याशास्त्रामध्ये संशोधन करून संभाव्यता सिद्धांतामध्ये मौलिक योगदान दिले. संभाव्यता सिद्धान्तातील अलौकिक कामगिरीसाठी अ‍ॅडम्स पारितोषिक (१९६०), पद्माभूषण पुरस्कार (१९७४), सर जेफ्रीज यांनी एका निष्पत्तीला दिलेले ‘हुजुरबाजारांचा अपरिवर्तनीय घटक (इनव्हेरिअंट)’ हे नाव (१९७६), इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटतर्फे गौरवग्रंथ (१९७९) अशा अनेक सन्मानांनी गौरविलेल्या हुजुरबाजार यांचे संख्याशास्त्रातील योगदान निश्चितच स्फूर्तिदायी आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत अध्ययन-अध्यापनात व्यस्त असणाऱ्या हुजुरबाजार यांचे देशातील संख्याशास्त्राच्या प्रसाराला चालना देण्यातील योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची ओळख तरुणाईला व्हावी म्हणून त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा...
डॉ. वसंत शंकर हुजुरबाजार यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१९ रोजी शंकर आबाजी आणि गंगाबाई हुजुरबाजार यांच्या पोटी कोल्हापूर येथे झाला. सहा भावंडापैकी ते चौथे होत. त्यांची मोठी बहीण कृष्णा या सामान्य सापेक्षता आणि गुरुत्व यावरील संशोधक सुप्रसिद्ध भौतिकी विष्णू वासुदेव नारळीकर यांच्या पत्नी तर लहान बंधू प्रसिद्ध गणितज्ञ. त्यांचे शालेय आणि पदवीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात झाले. शालेय विद्यार्थी असल्यापासून डॉ. हुजुरबाजार यांना संभाव्यता सिद्धांतामध्ये विशेष स्वारस्य होते. शालेय जीवनात त्यांच्या वर्गात नेहमी ते सर्व विषयात प्रथम असायचे. तथापि, त्यांना गणित आणि संस्कृत विषयांमध्ये विशेष अभिरुची होती.
 
पदवीसाठी राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तेथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या एका गणिताच्या अभ्यासक्रमात संभाव्यतेचे घटक आणि सांख्यिकी यांचा समावेश करण्यात आला होता. यासाठी राजाराम महाविद्यालयातील दोन गणिताच्या प्राध्यापकांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (आयएसआय) कोलकाता येथून सांख्यिकीमधील प्रशिक्षण घेऊन आले होते. तथापि हा नवीन सांख्यिकी चा अभ्यासक्रम पदवीपर्यंत नसल्याने त्यांना तो पुढे इच्छा असूनही पूर्ण करता आला नाही. त्यानंतर गणितातील पदव्युत्तर शिक्षणासाठी (१९४० ते १९४२) ते बनारस हिंदू विद्यापीठांमध्ये दाखल झाले.
 
बनारसमध्ये गणिताचे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना तेथे भारतीय विज्ञान वार्षिक परिषद (जानेवारी १९४१) संपन्न झाली. या वार्षिक परिषदेमध्ये प्रोफेसर पी.सी. महालानोबिस यांच्या प्रयत्नाने तेथे सांख्यिकीचा नवीन विभाग स्थापन केला गेला आणि परिषदेमध्येच त्या विभागाचे औपचारिक उद्घाटन सर मोरेस हॉलेट यांनी केले. त्याप्रसंगी प्रोफेसर महालानोबिस यांनी या नवीन विभागाला ‘मानवी जीवनाचे अंकगणित’(Arithmetic of human life, अर्थमेटिक ऑफ हुमन लाइफ) असा उल्लेख केला, जो हुजुरबाजार यांना खूप भावला आणि त्यांच्या भाषणाने ते प्रभावित झाले. याच वेळी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेमधील शेतकी संख्याशास्त्रज्ञ डॉ. पी. व्ही. सुखात्मे आणि त्यांची झालेली भेट आणि नोबेल विजेते सर सी. व्ही. रामन. यांचे ‘संभाव्यता’(Probability) वरील दर्शकांना मंत्रमुग्ध करणारे तासाभरा चे विविध किस्से युक्त व्याख्यान, यामुळे ते संख्याशास्त्राकडे आकर्षित झाले.
 
बनारस विद्यापीठातून गणिताची मास्टर पदवी घेतल्यानंतर भारतामध्ये संख्याशास्त्रातील संशोधनाच्या कोलकाता पुरत्याच मर्यादित असणाऱ्या संधी आणि दुसऱ्या महायुद्धाचा काळ असल्याने परदेशात जाणे अशक्य असल्याने १९४२ ते १९४६ पर्यंत ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत राहिले. याच दरम्यान, भारतात संख्याशास्त्र हा विषय प्राधान्याने पुढे आला आणि अनेक विद्यापीठांनी संख्याशास्त्राचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन केले आणि म्हणूनच डॉ. हुजुरबाजार यांनी सुद्धा मग संख्याशास्त्रामध्ये संशोधन करण्याचे ठरविले आणि दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ते इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठात संख्याशास्त्रात संशोधन करण्यासाठी दाखल झाले.
संशोधन व अध्यापन कार्य
सुदैवाने त्यांना डॉ. हेरॉल्ड जेफ्री जे व्यस्त संभाव्यता आणि अनुषंगिक अनुमान (इनवर्स प्रोबाबीलीटी एण्ड इनफरन्स बेस्ड ऑन इट) यामध्ये स्वारस्य असलेले सुप्रसिद्ध विद्वान होते. अनुमानाच्या या शाखेचे मूळ जरी १८ व्या शतकातील थॉमस बेजच्या संशोधनात असले तरी पुढे ते असमर्थित निष्कर्षामुळे काहीसे अप्रिय ठरले. तथापि, जेफ्री आणि इतरांनी त्यामध्ये अधिक संशोधन केले तर डॉ. हुजुरबाजार यांनी सफिशीएंट स्टेंटीस्टीक्स आणि एक्स्पोनेनशीयल फेमिली (Sufficient Statistics and Exponential Family)यांच्यातील संबंध व इनव्हेरीएंट प्रायर डीस्ट्रीब्यूशन्स (Invariant prior distributions) यावर आधारित दोन संशोधन लेख लिहिले. या लेखांमुळे डॉ. जेफ्री प्रभावित झाले आणि त्यांनी हुजुरबाजार यांचे संशोधन ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी प्रेस णे प्रकाशित केलेल्या ‘थेरी ऑफ प्रोबाबीलीटी’ च्या तिसऱ्या आवृत्तीत ‘हुजुरबाजार्स इनव्हेरीएंटस’ असे नामकरण करून प्रसिद्ध केले. डॉ. हुजुरबाजार हे ‘कमाल संभाव्यता विषयी अनुमान’(Maximum Likelihood Estimation), संभाव्यता वितरणाचे अपरिवर्तनीय घटक (Invariants of Probability Distributions) आणि पर्याप्त नमुना आकडे (Sufficient Statistics) आदी प्रमुख संशोधनासाठी परिचित आहेत.
इंग्लंडहून भारतात परतल्यानंतर हुजुरबाजार यांनी १९५० ते १९५३ या कालावधीमध्ये गुवाहाटी, मुंबई व लखनऊ विद्यापीठामध्ये अध्यापन कार्य केले. त्यानंतर शासनाच्या आर्थिक आणि सांख्यिकीय संचालनालयामध्ये त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर १९५३ मध्ये हुजुरबाजार यांना पुणे विद्यापीठात गणित आणि संख्याशास्त्र विभाग स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले गेले. तेथे त्यांनी या विभागाला नावारूपाला आणण्यासाठी प्रचंड कष्ट केले. तेथे त्यांनी पदवी अभ्यासक्रम सुरू केले. याशिवाय, नियमितपणे उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून असंख्य विद्यार्थी तसेच प्राध्यापकही आवर्जून हजेरी लावत असत. प्राध्यापकांमार्फत संख्याशास्त्राचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या तळमळीने केलेला तो एक उपक्रम होता.
 
१९७५-७६ मध्ये राष्ट्रीय व्याख्याता अशी नेमणूक मिळाल्यावर त्यांनी वर्षभरात काश्मीर ते कन्याकुमारी असा पूर्ण देश पिंजून काढून संख्याशास्त्राचे महत्त्व देशभर पोहोचवले. १९७६ या काळात त्यांची पुणे विद्यापीठातील गणित आणि संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. दरम्यान त्यांनी १९६२ ते १९६४ मध्ये अमेरिकेतील आयोवा स्टेट युनिवर्सिटी मध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. सेवानिवृत्तीनंतर १९७६ ते १९७९ मध्ये कॅनडामधील मेनिटोबा विद्यापीठात कार्यरत राहिले आणि १९७९ पासून अमेरिकेतील कोलोरेडो राज्यातील डेन्व्हर विद्यापीठात अखेरपर्यंत प्राध्यापक होते. तथापि, अमेरिकेत असताना त्यांना पत्नी प्रभादेवी यांचे निधन (१९८५), व्हिसा, स्थलांतर समस्या, नोकरीतील अनिश्चीत्तता, दोन मुलींच्या शिक्षणाची काळजी अशा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी ण डगमगता आपले संशोधन कार्य चालू ठेवले. सध्या त्यांच्या दोन्ही मुली स्नेहलता आणि अपर्णा या अमेरिकेतील विद्यापीठामध्ये संख्याशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. हुजुरबाजार आणि त्यांचे समकालीन डॉ. सी. आर. राव, डॉ. पी.व्ही. सुखात्मे आदींनी गणिताच्या आणि संख्याशास्त्राच्या प्रसारासाठी अथक परिश्रम केले. हुजुरबाजार यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्थेचे सभासद(१९७१), अमेरिकन सांख्यिकी मंडळाचे फेलो, १९५७ पासून भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे फेलो, १९६६-६७ च्या भारतीयविज्ञान संमेलनातील संख्याशास्त्र विभागाचे अध्यक्ष, इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या नियतकालिकाचे प्रमुख संपादक यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांच्या भारतातील संख्याशास्त्राच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचा यथोचित गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना १९७४ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, कोलकाता ने १९७९ या वर्षातील संख्या या नियतकालिकाचा पहिला अंक डॉ.वसंत शंकर हुजुरबाजार गौरवग्रंथ म्हणून प्रसिद्ध केला. १५ नोव्हेंबर १९९१ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन !!
प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ, सांगली
९४२३८२९११७
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.