निसर्ग सानिध्यात वसलेले माथेरान; 'या' १० लोकप्रिय स्पॉटला नक्की भेट द्या

    13-Sep-2022
Total Views |
 
matheran
 (Image Source : Internet)
 
रायगड :
महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेले आहे. राज्यातील रायगड जिल्ह्यात माथेरान हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे स्थळ विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. सह्याद्री पर्वतरांगांमधील हे ठिकाण आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते.
 
तुम्हाला पर्यटन आवडत असेल तर माथेरानला भ्रमंतीसाठी जाण्यासाठी भरपूर ठिकाण आहेत. ही स्थळे तुम्हाला रोमहर्षक अनुभव देण्याबरोबरच आश्चर्यचकित सुद्धा करू शकतात. या ठिकाणांवर गेल्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या व्यस्त शहराच्या तणावातून आराम मिळतो. 'भारतातील सर्वात गोंडस हिल स्टेशन' म्हणून ओळखले जाणार माथेरान हे अगदी प्रसन्नचित्त करणारे ठिकाण आहे.
 
निसर्गप्रेमी असो, पर्वतारोहण करणारे असो किंवा छायाचित्रकार असो, माथेरान हे सर्वांच्या आवडीचे स्थळ आहे. माथेरान याचा शब्दशः अर्थ 'ज्याच्या माथ्याशी (डोक्याशी) रान म्हणजे जंगल आहे' असे आहे. समुद्र किनारपट्टीपासून २६०० फूट उंचीवर असलेल्या माथेरान येथे पर्यटकांसाठी अनेक चित्त थरारक व्युवपॉईंट आहेत.
 
१. लुईसा पॉईंट
माथेरान हे एक हिल स्टेशन असून येथील अनेक ठिकाणावरून निसर्गरम्य दृश्य बघायला मिळते. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे लुईसा पॉईंट. येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला ट्रेक करावे लागेल.

louisa point (Image Source : Internet/Chandni Aggarwal)
 
२. शार्लोट लेक
हा तलाव जंगलाच्या समृद्ध हिरव्या वर्तुळात विसावलेला आहे. जर तुम्ही मनःशांती शोधत असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.

charlotte lake
 (Image Source : Internet)
 
३. मंकी (माकड) पॉईंट
या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला ट्रेक करावे लागेल किंवा घोडेस्वारी सुद्धा इथे उपलध आहे. या ठिकाणी जाताना मात्र आपल्यासोबत कुठलेही खाद्यपदार्थ नेताना काळजी घ्या. कारण माकडे ते हिसकावून घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासह येथे येऊ शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवू शकता.

monkey point (Image Source : Internet)
 
४. पॅनोरमा पॉईंट
येथील उगवत्या सूर्याचे म्हणजेच सूर्योदयाचे विलोभनीय दृश्य तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. जसजसा दिवस उजाडतो, तसतसे आकाशात पसरणारे रंग तुमचे मन नक्कीच प्रसन्न करेल आणि तुमचा सर्व तणाव दूर होईल.
panorama point
 (Image Source : Internet)
 
५. नेरळ - माथेरान टॉय ट्रेन
जवळपास शंभर वर्ष जुनी ही ट्रेन माथेरानचा जणू एक वारसाच आहे, असे म्हणता येईल. ही ट्रेन तुम्हाला दाट जंगलातून फिरवते आणि झिग-झॅक पद्धतीने वरच्या दिशेला नेते.
 
Neral Matheran Toy Train
  (Image Source : Internet)
 
६. माथेरान बाजार
माथेरान येथे प्रादेशिक हस्तकला आणि कलात्मक वस्तू मोठ्या प्रमाणात आढळतात. येथे हस्तनिर्मित चामड्याची पादत्राणे सुद्धा मिळतात. विशेषतः कोल्हापुरी पादत्राणे पर्यटकांना आकर्षित करतात.

Matheran Market  (Image Source : Internet)
 
७. धोडानी धबधबा
माथेरानमधील डोंगरांच्या पायथ्याशी असलेला हा धबधबा भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. ९० फूट उंचीचा हा धबधबा निसर्गाची एक निराळी झलक देते. या धबधब्याला नैसर्गिक फोटोग्राफीसाठी एक सर्वोत्तम ठिकाण म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येथे अनेकदा तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला ग्रुप ॲडव्हेंचर सुद्धा आयोजित केले जाते.

Dodhani Falls  (Image Source : Internet)
 
८. प्रबळगड किल्ला
पश्चिम घाटातील २३०० फूट उंचीवर असलेला प्रबळगड किल्ला हे ऐतिहासिक ठिकाण आहे. रात्रीच्या वेळी येथे शिबिराचे आयोजन देखील केले जाते.

Prabalgad Fort (Image Source : Internet)
 
९. इर्शाळगड किल्ला
माथेरान आणि पनवेलच्या मध्यभागी असलेल्या इर्शाळगड किल्ला प्रबळगडची बहीण म्हणूनही ओळखला होतो. इर्शाळगड किल्ला हा ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. हा किल्ला ट्रेकिंग, हायकिंग आणि कॅम्पिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

Irshalgad Fort(Image Source : Internet/mtdc) 
 
१०. मोरबे धरण
मोरबे धरण माथेरानपासून ३० किमी अंतरावर आहे. मोरबे धरण समुद्रसपाटीपासून सुमारे १९४ फूट उंचीवर आहे आणि धारावी नदीच्या पलीकडे बांधलेला आहे. मोरबे धरण ९,७८० चौरस किमीच्या पृष्ठभागात पसरलेला आहे. येथून सूर्यास्ताचे दृश्य अगदी नयनरम्य असते.
 
निसर्गाच्या जवळ राहण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी माथेरान हे उत्कृष्ट असे स्थान आहे.