भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांच्या स्वागताची तयारी, असा आहे संपूर्ण इतिहास

12 Sep 2022 06:12:43

cheetah
(image source:knp) 
 
नागपूर:
 
जगातला सगळ्यात वेगाने धावणारा प्राणी म्हणजे चित्ता, आपली सडपातळ शरीरयष्टी, अंगावरील भरीव ठिपके अन् चेहऱ्यावर अश्रूंसारख्या दिसणाऱ्या रेषा ही चित्त्याची ओळख, चित्ता हे नाव तसे तर मूळचे संस्कृत 'चित्रक्य' असून, मराठीत या प्राण्याला चित्ता असे संबोधिले जाते. हा प्राणी सध्या दुर्मिळ झाला असून, सण 1952 मध्ये चित्ता हा भारतातून नामशेष झाला. छत्तीसगडचे महाराज रामानुज प्रताप सिंह यांनी शेवटच्या तीन चित्त्यांची शिकार केली होती. असा उल्लेख आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातून नामशेष होणारा चित्ता हा एकमेव सस्तन प्राणी आहे.
 
 
 
 
चित्त्या बद्दल इतकं सांगण्याचे कारण असे की, आफ्रिकेतील नामिबिया येथून आठ चित्त्यांचे भारतात पुनर्वसन केले जाणार आहे. यात पाच नर आणि तीन मादींचा समावेश आहे. नागपूर नजीकच्या मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात हे चित्ते सोडल्या जाणार आहेत. चक्क एका खंडातून दुसऱ्या खंडात मांसाहारी प्राण्यांचे पुनर्वसन करणे नक्कीच सोपे नाही. यामध्ये काही प्रमाणात धोके सुद्धा उद्भवतात परंतु असे करणे शक्य आहे.
 
सण 1980 च्या उत्तरार्धात मलावी येथील जंगलातून चित्ते हे प्राणी नामशेष झाले होते. परंतु 2017 मध्ये तेथे चार चित्ते पुन्हा वसवण्यात आले. आता मलावी मधल्या चित्त्यांची संख्या चार वरून थेट 24 वर आली आहे. चित्ता हा प्राणी आजूबाजूच्या वातावरणात लगेच मिळून मिसळून जातो. त्यामुळे हे करणे शक्य झाले आहे. भारतात चित्त्यांचे पुनर्वसन करणे हे भारत सरकारच्या एका अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्पाचा भाग आहे.
 
cheetah(image source: TwitterMoef&cc ) 
 
चित्याच्या दोन प्रजाती आहेत, एक म्हणजे आशियाई आणि दुसरी म्हणजे आफ्रिकी. भारतातून झालेल्या नामशेष आशियाई चित्त्याची शेवटची प्रजाती फक्त इराणमध्ये आढळते, तेथे दहा ते वीस आशियाई चित्ता वाचले आहे. लेखक कबीर संजय लिखित 'चिता भारतीय जंगलो का गुम शहजादा' या पुस्तकानुसार भारतातून चित्ता नामशेष झाल्यानंतर उझबेकिस्तान मध्ये 1982 साली व तूर्बेकिस्तान मध्ये नोव्हेंबर 1984 साली शेवटचा चित्ता आढळला होता. यानंतर या देशात चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले.
 
एक काळ असा होता जेव्हा मध्य आशिया, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारतात मोठ्या प्रमाणात चित्त्यांचे आढळायचे. भारताच्या राजस्थान, पंजाब, सिंध, गंगा किनार्‍यापासून बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या जंगलात आशियाई चित्त्यांची संख्या भरपूर प्रमाणात आढळत असे. काळवीट, नीलगाय, यासारख्या अनेक प्राण्यांची शिकार ते करत असत परंतु, नंतरच्या काळात त्यांचा वापर शिकारीसाठी करण्यात येऊ लागला. वन्यजीव तज्ञांच्या मते, विसाव्या शतकापर्यंत चित्त्याच्या संख्येत घट झाली. सण 1918 ते 1945 दरम्यान राजा महाराजा आफ्रिकेहून चित्ते मागवून त्यांचा वापर शिकारीसाठी करत, सोळाव्या शतकात मुघल बादशहा जहांगीरच्या काळात जगात पहिल्यांदाच चित्ता पाळण्यात आल्याचे सांगितल्या जाते.
विसाव्या शतकात हे प्राणी शिकारीसाठी आयात करण्यात आले. चित्त्याला पाळीव बनवल्यापासून किंवा बंदिस्त ठेवल्यापासून दोन गोष्टी प्रामुख्याने पहावयास मिळतात. एक म्हणजे, शिकार करण्याची त्यांची प्रवृत्ती कमी झाली आणि दुसरी म्हणजे, पिंजऱ्यात कैद केल्यामुळे ते प्रजनन करू शकत नव्हते.
 
 
प्रजननासाठी जेव्हा मादी चित्ता नर चित्त्याच्या जवळ जात असे, तेव्हा तिच्या पिल्लाला (शावक ) एकटं राहावं लागत असे. त्यावेळी ते शावक शिकार बनत आणि शिकार होण्यापासून वाचलेल्या शावकाना बंदिवासात असल्यामुळे त्यांच्या आईकडून जे प्रशिक्षण मिळायला हवे ते सुद्धा ते पिंजऱ्यात असल्यामुळे मिळत नसे, त्यामुळे त्यांची शिकार करण्याची प्रवृत्ती कमी झाल्याचे दिसते. तसेच चित्त्यांची आकर्षक कातडी ही त्यांच्या शिकाराला कारण ठरल्याचे बोलल्या जाते. त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात आली. अरबी देशात तर आणखी सुद्धा चित्याच्या पिलाला सात लाखात विकत घेऊन त्यांची तस्करी करण्यात येते. ही बाब सुद्धा त्यांच्या नामशेष होण्यामागचे मोठे कारण ठरले.
 
एका संशोधनानुसार, सण 1799 ते सण 1968 या कालावधी दरम्यान भारतातल्या जंगलात किमान 230 चित्ते शिल्लक होते. सण १८८० मध्ये विशाखापट्टणम येथे तत्कालीन गव्हर्नरच्या एजंटला चित्त्याच्या हल्ल्यामुळे आपला जीव गमावावा लागला होता, त्यानंतर ब्रिटिश सरकारने चित्त्याला हिंसक प्राणी घोषित करून त्याला मारणाऱ्याला बक्षीस देऊ घोषित केले. वन्यजीव तज्ञांच्या मते, विसाव्या शतकापर्यंत चित्त्याच्या संख्येत घट झाली. स्वातंत्र्यानंतर वाघ सिंह यांच्यासाठी वेगवेगळे संरक्षण अभियान राबवण्यात आले. परंतु, चित्यासाठी ते केल्या गेले नाही.
 
सण 1970 च्या दशकात इराण मधून चित्ता भारतात आणण्याचा प्रयत्न झाला होता, त्याकाळी इराणमध्ये 300 चित्ते होते परंतु, तेव्हा इराणच्या शहाची सत्ता गेल्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला. जगातल्या एकूण सात हजार चित्त्यांपैकी बहुतांश चित्ते दक्षिण आफ्रिका नामिबिया येथे आढळतात २००९ पासून पुन्हा चित्त्याच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न चालू केले.
 
आफ्रिकातील नामिबिया येथून आठ चित्त्याचे पुनर्वसन भारतातील मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये करण्यात येईल, चित्त्यांना जोपर्यंत भक्ष मिळत राहील तोपर्यंत त्याला अधिवासाला जागा कमी पडणार नाही, परंतु काही वेळेस चित्ते शेतात घुसून पाळीव प्राण्यांना सुद्धा आपले भक्ष बनवतात. त्यामुळे मानवप्राणी संघर्ष उद्भवतो. परंतु काही वेळेस स्वतः चित्ता इतर प्राण्यांचं भक्ष बनतो असे तज्ञ यांचे मत आहे.
 
भारतातून चित्ता नामशेष झाल्याच्या सात दशकानंतर भारत आणि नामीबियात जुलैमध्ये चित्ता स्थलांतरणाबाबत करार करण्यात आला व असाच करार दक्षिण आफ्रिके सोबत देखील करण्यात आला आहे. स्थानांतरनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे 15 ऑगस्ट ला भारतात चित्त्याच्या आगमन होणार होते. चित्ता आणण्याच्या तयारीला वेग आलेला असतानाच भारताने आठ पैकी तीन चित्त्यांना नकार दिला. कारण ते बंदिवासात जन्मलेले असून शिकार करू शकणार नाही असे सांगितले गेले नाकारलेल्या तीन चित्त्या ऐवजी ते बदलून देण्याचा कोणताही विचार नसल्याने नामिबियाने म्हटले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी अर्थत १७ सप्टेंबर रोजी हे चित्ते आणल्या जाणार आहेत.
 
 - प्रतिभा प्रवीण वानखेडे
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.

 
 
Powered By Sangraha 9.0