चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवे सम्राट

    12-Sep-2022
Total Views |

king charles III with Queen Elizabeth II (Image Source : Internet)
 
 
ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाल्यानंतर भारतासह जगातील सर्वच देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. ब्रिटनच्या राणीच्या निधनाने ब्रिटनमध्ये शोककळा पसरली. ब्रिटनच्या राजगादीवर सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी म्हणून इतिहासात राणी एलिझाबेथ यांची नोंद झाली. १९५२ साली राणी एलिझाबेथ या ब्रिटनच्या राजगादीवर बसल्या. १९५२ ते २०२२ असे एकूण ७० वर्ष त्यांनी ब्रिटनचे सम्राज्ञीपद सांभाळले. इतकी प्रदीर्घ काळ एखादी व्यक्ती एखाद्या देशाच्या प्रमुखपदी राहते, ही आश्चर्याचीच बाब आहे. अर्थात राणी एलिझाबेथ यांची कारकीर्द आदर्शवतच होती. विशेषतः ब्रिटनच्या नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदर होता. ब्रिटनची राणी म्हणून केवळ ब्रिटनमध्येच नव्हे तर जगभर त्यांना मान होता. आता त्यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या राजघराण्याची जबाबदारी त्यांचे सुपूत्र चार्ल्स तिसरे यांच्यावर आली आहे. चार्ल्स तोसरे हे आता ब्रिटनचे नवे सम्राट असणार आहेत.
 
राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आणि लंडनच्या जेम्स पॅलेसमध्ये शनिवारी एक दिमाखदार सोहळा झाला. या सोहळ्यात चार्ल्स तिसरे यांचा राज्यभिषेक करण्यात आला. या राज्यभिषेक सोहळ्याला ब्रिटनमधील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होत्या. विशेष म्हणजे हा राज्याभिषेक सोहळा पहिल्यांदाच दूरचित्रवाणीवर लाईव्ह दाखविण्यात आला. ब्रिटनचे नवे सम्राट चार्ल्स तोसरे हे ७३ वर्षाचे असून राणी एलिझाबेथ यांचे ते जेष्ठ सुपूत्र आहेत.
 
ब्रिटनच्या राज्यघटनेनुसार, राजेपद जास्त दिवस रिक्त ठेवता येत नाही म्हणून त्यांचा राज्यभिषेक सोहळा तातडीने उरकण्यात आला. राज्यभिषेक सोहळा पार पडल्यानंतर नवनियुक्त सम्राट चार्ल्स तोसरे यांनी जनतेला संबोधित करताना भावपूर्ण भाषण केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, माझ्या आईची कारकीर्द समर्पण आणि निष्ठा याबाबतीत अतुलनीय होती. आईच्या निधनाने आम्ही दुःखी आहोत. तरीही आईची निष्ठा आणि विश्वासू जीवनाबद्दल तिचे कृतज्ञ आहोत. ब्रिटनचे सम्राटपद स्वीकारताना मी घटनात्मक सरकार टिकवण्यासाठी आणि जगातील सर्व देशातील शांतता, सौहार्द आणि समृद्धीसाठी प्रयत्नशील राहील. त्यांच्या भावपूर्ण भाषणाने ब्रिटनमधील जनता हेलावून गेली आणि सर्व जनतेने त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
ब्रिटनमध्ये लोकशाही आहे हे आपण जाणतोच. जगातील सर्वाधिक जुनी लोकशाही म्हणून ब्रिटनकडे पाहिले जाते. ब्रिटनच्या लोकशाहीत ब्रिटनचे राजे हे ब्रिटनचे राष्ट्रप्रमुख असतात. अर्थात आपल्याकडे राष्ट्रपतींची जी जबाबदारी असते, तीच ब्रिटनमधील राजाकडे असते. एकाअर्थी ब्रिटनचा राजा हा तेथील राष्ट्रपतीच आहे. जसे आपल्याकडे राष्ट्रपतींचे अधिकार हे औपचारिक आणि नाममात्र असतात तसेच ब्रिटनच्या राजाकडील अधिकार औपचारिक आणि नाममात्र स्वरूपाचेच असतात. आपल्या राष्ट्रपती प्रमाणे त्यांनाही राजकीयदृष्ट्या तटस्थ राहावे लागते. केवळ आपल्या आणि त्यांच्या राष्ट्रप्रमुखात फरक एवढाच आहे की, आपल्या देशातील कोणताही नागरिक राष्ट्रपती होऊ शकतो, ब्रिटनमध्ये मात्र राजघराण्यातील व्यक्तीच राष्ट्रप्रमुख होऊ शकतो. ब्रिटनच्या घटनेनुसार, निवडणुकीत विजय झालेल्या नव्या सरकारला आणि त्या सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांना राजाच शपथ देतो.
 
ब्रिटनच्या संसदेची सुरुवात सम्राटाच्या अभिभाषणनेच होते. ब्रिटनच्या सम्राटाकडे सरकारतर्फे दररोज काही कागदपत्रे लाल रंगाच्या कातडी बॉक्समधून पाठवले जातात. या कागदपत्रांवर सम्राटाची औपचारिक सही परवानगी स्वरूपात घेण्यात येते. सम्राटाची सही झाल्यावरच ती कागदपत्रे सरकारी दस्तऐवज मानली जातात. शिवाय ब्रिटनचे पंतप्रधान दर आठवड्याला सम्राटांना भेटून सरकारच्या कामकाजाविषयी माहिती देत असतात. ब्रिटनचा सम्राट हा त्यांचा घटनात्मक प्रमुख असल्याने संपूर्ण जगात ब्रिटनच्या सम्राटाला मान दिला जातो. राणी एलिझाबेथ यांनी ७० वर्ष हे पद यशस्वीरीत्या सांभाळले आता त्यांचे चिरंजीव चार्ल्स तिसरे हे देखील आईप्रमाणेच या पदाची प्रतिष्ठा राखतील, अशी आशा ब्रिटनच्या नागरिकांना आहे.
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.