पितृपक्ष म्हणजे काय? जाणून घ्या 'या' दिवसांचे महत्व

    10-Sep-2022
Total Views |
 
pitru paksha
 
नागपूर :
प्रत्येकवर्षी १६ दिवसांचा एक महत्वपूर्ण कालावधी येतो. या कालावधीला हिंदू धर्मात पितृपक्ष किंवा श्राद्ध म्हणूनही ओळखल्या जाते. पितृपक्ष का भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष असतो, ज्याला महालय असेही म्हणतात. या कालावधीत आपले पूर्वज किंवा नातेवाईकाचा ज्या तिथीला मृत्यू झाला असेल त्यांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी प्रार्थना केली जाते. श्राद्ध करत असताना पूर्वजांना त्यांचे आवडते अन्न नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. असे केल्यास घरात समृद्धी आणि आनंद येते, अशी मान्यता आहे. पितृपक्ष हे आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांनी आपल्यासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा तसेच त्यांचे स्मरण करण्याचा एक मार्ग आहे.
 
पितृपक्षाचे महत्व
भारतीय परंपरेतील पौराणिक कथेनुसार, पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी यामधील विशेष क्षेत्रात राहतात त्याला 'पितृ लोक' म्हणतात, असे मानले जाते. पूर्वज म्हणजे परलोकात गेलेल्या आपल्या मागील तीन पिढ्या. मृत्यूचा देवता म्हणजे यम हा जगाचा प्रभारी असतो. असे मानले जाते की, पहिल्या पिढीला जेव्हा स्वर्गात नेले जाते, तेव्हा दुसऱ्या पिढीतील एक सदस्य मरण पावतो. पितृ लोकांमध्ये गेलेल्या तीन पिढ्यांची विधि केली जाते. श्राद्ध जर विधिपूर्ण, समर्पण, प्रेम आणि आदराने केले तर पूर्वज प्रसन्न होतात आणि नकारात्मक शक्तींपासून आपले रक्षण करून आपल्याला समृद्धी आणि यश प्रदान करतात.
 
pitru paksha  
पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळण्याव्यतिरिक्त आपण त्यांनी केलेल्या पापांचे देखील वारसदार असतो. कधी कधी त्यांनी केलेल्या काही दुष्कृत्यांमुळे त्यांना मृत्यूनंतरही शांती मिळत नाही. सध्याच्या पिढीला त्यांच्या पूर्वजांच्या अशांततेने कष्ट होऊ शकते. अशात त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी श्राद्ध हा एक मार्ग मानला जातो. श्राद्धातील तर्पण विधी पार पाडल्याने त्यांना त्यांच्या पापांसाठी मनःशांती मिळू शकते.
 
प्रामुख्याने अपघात किंवा आत्महत्येमुळे झालेल्या अनैसर्गिक मृत्यूमुळे परलोकात जाण्यास आत्म्याला व्यत्यय येत असल्याचे मानले जाते. या अनपेक्षित मृत्यूचे परिणाम दूर करून आत्म्याला शांती मिळावी, यासाठी श्राद्धात तर्पण विधि अत्यंत महत्वाची मानली जाते. आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करणे पुण्यकारक असते.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.