10 कोटी 35 लाखाची कर चुकवेगिरी करणाऱ्याला अटक

    07-Aug-2022
Total Views |
 

gst
 pic- internet
नागपूर:
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सुमारे 58 कोटीच्या बेकायदेशिर व्यवहारांच्या आधारे बोगस इनपूट टॅक्स क्रेडीट घेऊन व खोटी बिले जारी करुन शासनाची 10 कोटी 35 लाख कर महसूलाची हानी करणाऱ्या धनंजय घाडगे या व्यक्तीस अटक केली आहे.
मेसर्स प्रिमियम इंटरनॅशनल या व्यापाराच्या अनुषंगाने सुरु असलेल्या अन्वेषण कार्यवाही दरम्यान बोगस पुरवठादार व्यापाऱ्यांचे जाळे तयार केले गेले असे चौकशी दरम्यान विभागाच्या लक्षात आले. अशाप्रकारे लोकांना फसवून त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे 8 बोगस फर्मस् तयार करुन व स्व:ताच्या नावे मेसर्स घाडगे ट्रेडर्स या नावाने एक बोगस फर्म तयार करुन बोगस व्यापाऱ्यांचे जाळे तयार करण्यात आले व त्याआधारे बोगस इनपूट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून खोटी बिले जारी करुन शासनाची 10.35 कोटीच्या कर महसूलाची हानी करणाऱ्या मेसर्स घाडगे ट्रेडर्सचे मालक धनंजय घाडगे यांना अटक करण्यात आली आहे.
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून यापूर्वीही याच प्रकरणात मेसर्स प्रिमियम इंटरनॅशनलचे मालक मोहम्मद सलीम खान यांच्याविरुध्द देखील अटक आदेश जारी करण्यात आले होते.
या धडक अन्वेषण कार्यवाही अप्पर राज्यकर आयुक्त अनंता राख व राज्य सहआयुक्त संजय कंधारे, राज्य कर उपायुक्त विलास पाडवी यांच्या मादर्शनात राज्य आयुक्त सचिन धोडरे यांनी सहायक आयुक्त दिपक शिरगुरवार व संतोष हेमने व कर्मचारी यांच्या मदतीने मोहीम राबविण्यात आली.
अशा प्रकारच्या धडक मोहिमेंतर्गत महाराष्ट्र वस्तु व सेवा कर विभागाने या आर्थिक वर्षात कर चुकवेगिरी करणाऱ्या 31 व्यकतींना अटक केली आहे. सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन वस्तू व सेवा कर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एकप्रकारे मोठा आव्हान उभे केले आहे.