देशात आफ्रिकन स्वाईन फिवरचा धोका; केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे आदेश

    05-Aug-2022
Total Views |
 
african swine fever (Image Source : Internet)
 
 
मुंबई :
भारतातील कोरोना विषाणूचे संकट अद्याप निवळले नसून त्यात मंकीपॉक्स आजाराची भर पडलीच आहे. देशातील आरोग्य यंत्रणा आणि नागरिक या आजारांशी लढत असताना आता आणखी एका रोगाचा धोका समोर आला आहे. देशातील पूर्वोत्तर राज्यांमध्ये तसेच उत्तरप्रदेश व बिहार या राज्यामध्ये वराह प्रजातीत ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ (ASF) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. यानुसार केंद्र शासनाने या राज्यांना जैव सुरक्षा, उपाययोजना करणे, प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच इतर राज्यांनाही सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
 
‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ हा वराहमधील विषाणूजन्य रोग आहे. हा आजार एस्फीव्हायरस या विषाणूमुळे होतो. सर्व वराह प्रजातींमध्ये (पाळीव व जंगली) याचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगामुळे बाधित वराहांची मोठ्या प्रमाणात मर्तुक होते. त्यामुळे वराह पालन करणाऱ्या पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हा आजार वराहापासून मानवाला किंवा इतर प्राण्यांना होत नाही. त्यामुळे हा आजार सार्वजनिक आरोग्यास धोकादायक नाही. महाराष्ट्र राज्यात २० व्या पशुगणनेनुसार १,६१,००० वराह संख्या आहे. राज्यात वराहांची संख्या मर्यादित असलेल्या आणि या रोगाची बाधा इतर पशुधनास होत नसल्यामुळे पशु पालकांनी घाबरून जाऊ नये.
 
‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ या आजाराचा प्रसार बाधित व मृत वराहाच्या रक्त, उती, स्राव आणि विष्ठेमधून होतो. बाधित वराह निरोगी वराहाच्या संपर्कात आल्यास रोगाची लागण होऊ शकते. आजारातून बरे झालेले वराह विषाणूचे वाहक (Carrier) असतात. त्याचप्रमाणे या रोगाच्या विषाणू बाधित वाहने, कपडे, भांडी, साधनसामुग्री आणि पादत्राणे यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विषाणूचा प्रसार होऊ शकतो. Omithiodoros या प्रजातीतील गोचीडाद्वारे या विषाणूचा प्रसार होतो. ‘आफ्रिकन स्वाईन फिवर’ (ASH) या रोगावर प्रभावी औषधोपचार अथवा लसमात्रा उपलब्ध नाही.
 
घरगुती तसेच हॉटेलमधील वाया गेलेले, शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे ही बाब विषाणूच्या प्रसारास मुख्यत्वे करून कारणीभूत असल्याने अशा प्रकारचे खाद्य देणे टाळणे गरजेचे आहे. असे करणे अवघड असल्यास मांस विरहित (शाकाहारी) अन्न २० मिनिटापेक्षा जास्त वेळ उकळवून द्यावे. निरोगी वराहाचे घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस, उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये. वराहपालन केंद्रातील तसेच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवून ठेवू नये. सर्व कचरा (Waste) नष्ट करावा अथवा त्याची सार्वजनिक कचरा व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्त दृष्ट्या योग्य रितीने विल्हेवाट लावावी. प्रभावी जैव सुरक्षा नियमांचा अवलंब, बाधित क्षेत्रात वराह तसेच वराहजन्य पदार्थांच्या वाहतुकीवर प्रतिबंध आणि बाह्य कीटकांचे नियंत्रण करून या रोगाचे नियंत्रण करता येईल, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे यांनी दिली आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.