(Image Source : Internet)
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, स्पष्टवक्ते डॉ. विनायक मनोहर दांडेकर यांचा ३१ ऑगस्ट हा स्मृतिदिन. संख्याशास्त्रज्ञ म्हणूनही ख्यातनाम असणाऱ्या दांडेकरांनी पाणी, शेती, बेरोजगारी या क्षेत्रात मोलाचे कार्य केले असून त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न, प्राथमिक शिक्षणातील त्रुटी, खेडेगावाचा व शेतीचा अभ्यास आदी अनेक विषयांचा संख्याशास्त्रावर आधारित विश्लेषणात्मक अर्थशास्त्रीय अभ्यास केला. शेतीसाठी पाणी वापरताना, पाण्याचे पिकाप्रमाणे नियोजन कसे करावे, उसाची लागवड कमी करून इतर पिकांना पाणी देणे, भाकड गुरांची कत्तल करावी इत्यादी त्यांची परखड मते शास्त्रीय कसोट्यांवर आधारलेली होती. तथापि, ती अनेकांच्या पचनी पडणे अवघड असल्याने त्यांची अंमलबजावणी झाली नाही. दांडेकरांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर अर्थविषयक तज्ञ सल्लागार म्हणून काम केले असून त्यांनी दीडशेहून अधिक पुस्तके व शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा तरुणाईला परिचय व्हावा म्हणून हा प्रयत्न...
डॉ. विनायक महादेव दांडेकर यांचा जन्म सातारा येथील एका गरीब कुटुंबात ६ जुलै १९२० रोजी झाला. त्यांचे शिक्षण नागपूर, पुणे व कोलकाता येथे झाले. त्यांनी कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (ISI) मधून संख्याशास्त्राचा अभ्यास केला. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी व सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर पीएचडीसाठी (PhD) त्यांना लंडन विद्यापीठात प्रवेश मिळाला. तथापि, बोटीने प्रवास करत असताना अनेक भारतीय विद्यार्थ्यांना ज्या प्रकारची वागणूक जहाज कंपनीने दिली त्याचा निषेध म्हणून ते मुंबई बंदरात उतरले आणि परदेशवारी नाकारून उच्च शिक्षणाला त्यांनी रामराम ठोकला. त्यानंतर एक वर्ष संख्याशास्त्र म्हणून मुंबई येथे सरकारी खात्यात नोकरी केल्यानंतर ते पुण्याला गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स या संस्थेत नव्याने निर्माण केलेल्या दोराबजी टाटा सेक्शन इन अग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स यामध्ये अर्थशास्त्राचे संशोधक म्हणून ते कार्य करू लागले.
डॉ. सी.आर. राव यांचे विद्यार्थी असतानाचा किस्सा
कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टीकल इन्स्टिट्यूट (ISI) मध्ये प्रोफेसर सी.आर. राव एकदा प्रो. आर.ए. फिशर यांचे एक प्रमेय शिकवीत होते. (१९४३) हे प्रमेय फिशर यांनी मोठ्या नमुन्यासाठी (लार्ज सैम्पल) सिद्ध केले होते. त्यावेळी एका विद्यार्थ्याने लहान नमुन्यांसाठी (स्मॉल सैम्पल) हे प्रमेय लागू होईल का असे विचारले. प्रश्न फार महत्वाचा. कारण अनेकवेळा लहान नमुन्यांवरच काम करावे लागते. पण लहान नमुन्यांसाठी प्रमेय सिद्ध केले नसल्याने राव सरांनी विचार करून सांगतो, असे सांगितले. घरी गेल्यावर रात्रभर जागून त्यांनी ते प्रमेय लहान नमुन्यासाठी सिद्ध केले, ज्यामध्ये एका संख्याशास्त्रीय संकल्पनेसाठी विचलनाची (व्हेरियन्स) लघुत्तम किंमत (लोअर बॉउंड) दिलेली होती.
दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याला उत्तर मिळाले, पण त्या एका प्रश्नाने संख्याशास्त्राचे एक पाउल पुढे पडले होते, हे विशेष. त्यातून राव सरांचा एक संशोधन लेख तयार झाला. तो १९४५ मध्ये प्रकाशित झाला. त्यांनी प्रख्यात संख्याशास्त्रज्ञ प्रो. जे. निमन यांना प्रकाशित लेखाची प्रत पाठविली. त्यांनी राव सरांच्या अभिनंदना बरोबरच लेखाचे नामकरणही केले. क्रामर यांनीही अशाच प्रकारचे संशोधन केले असल्यामुळे क्रामर-राव इनइकव्यालीटी असे लेखाचे नामकरण केले. राव- क्रामर म्हणायला चांगले वाटणार नाही म्हणून क्रामर-राव. बऱ्याच लोकांना क्रामर हे नाव तर राव हे आडनाव आहे, असे वाटते. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी प्रकाशित झालेला राव सरांचा हा लेख पुढे पुस्तकातही समाविष्ट झाला. प्रो. सीर.आर.राव पुढे केवढे कार्य करणार आहेत, त्याची जणू काही ही नांदीच होती. तो विद्यार्थी म्हणजेच प्रो.व्ही. एम. दांडेकर, संचालक, गोखले इंस्टीट्युट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स.
डॉ. दांडेकर यांचा विवाह कुमुदिनी यांच्याशी १९४५ साली झाला. पत्नी कुमुदिनी याही अर्थशास्त्रज्ञ होत्या. दांडेकरांनी विश्लेषणात्मक अर्थशास्त्राचा अभ्यास स्वबळावर केला. कारण त्यांनी अर्थशास्त्राचे औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. सुरुवातीची ५ वर्षे खेडेगावाचा व शेतीचा त्यांनी अभ्यास केला, सर्वेक्षण केले. यामुळे त्यांना खेडेगावातील अर्थशास्त्र व समाज (सोसायटी) समजून घेणे सोपे झाले. त्यांचे वाचन प्रचंड नसले तरी ते नेमके व निवडक वाचन करीत. त्यांच्या चिकित्सक वाचनात चौकसपणा होता. शेवटची १३ वर्षे ते ‘इंडियन स्कूल ऑफ पॉलीटीकल इकॉनॉमिक्स’ चे निर्देशक (डायरेक्टर) होते. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी पदवी व पदव्युत्तर परीक्षेसाठी अध्यापन केले आहे. त्यांनी ‘जरनल ऑफ इंडियन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’ चे संपादक म्हणूनही काम केले आहे. शिक्षणाची खालावलेली पातळी आणि परीक्षापद्धती यामुळे ते समाधानी नव्हते त्या संदर्भात त्यांनी काही उपायही सुचवले.
‘ब्रेन डेन’ संबंधी त्यांनी लिहिलेला लेख खूपच गाजला. पण प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसून आला नाही. त्यांनी डॉ. नीलकंठ रथ यांच्यासोबत ‘पॉवर्टी इन इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. गरीबी ही उत्पन्नाशी संबंधित आहे. तथापि, उत्पन्ना संबंधी माहिती नसल्याने त्यांनी खर्चाच्या माहितीचा उपयोग केला. त्यांनी किमान आवश्यक ऊर्जा (कॅलरी) मिळविण्यासाठी लागणाऱ्या अन्नाच्या खर्चावरून गरिबीरेषा ठरवली. भारतातील भिन्न भौगोलिक क्षेत्रात व समाज घटकात अन्नाच्या गरजांमध्ये फरक पडत असल्याने त्यांचाही विचार आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. वास्तविक गरिबी व बेकारी या दोन वेगळ्या संकल्पना असल्या, तरी त्या परस्परावलंबी आहेत हे स्पष्ट करताना त्यांनी सर्वसाधारणपणे धडधाकट व्यक्तीला वर्षभर प्रचलित दराने काम (मजुरी) मिळाल्यास ती व्यक्ती गरीबी रेषेखाली येत नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारतातील दारिद्र्य’ (१९७३) या शीर्षकाने पुण्याच्या समाजप्रबोधन संस्थेने प्रकाशित केला.
दांडेकरांनी मराठीतून लेखन केले असले तरी ते सुबोध होते. त्यांचे लेखन नुसतेच आक्रमक नसून शैलीदार, आकर्षक व आर्जवी होते. सर्वसामान्यांसाठी लिहिलेल्या लेखात शास्त्रीय परिभाषेचा अनावश्यक वापर न करता उलट ते लेख सुगम, सोपे व स्पष्ट आहेत.अल्प राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याचे विषम वितरण, विकासाचा मंद वेग आणि विकासापासून होणाऱ्या मर्यादीत फायद्याचे विषम विभाजन हे या ग्रंथातील महत्वाचे मुद्दे आहेत. याशिवाय या प्रश्नांची व्याप्ती,त्यांचे वाढते गांभीर्य व त्यातून निर्माण होणाऱ्या भयावह परिस्थितीवरील उपाय यांचीही चर्चा या पुस्तकात केली आहे. निर्भयता हे त्यांच्या लेखनाचे व भूमिकेचे एक मोठे वैशिष्ठ्य असून त्यांची भूमिका केवळ टीकाकाराची नसून समाजशिक्षकाचीही असल्यामुळे तिला एक वेगळे वजन प्राप्त होते. ‘गरिबी हटाओ, पण कशी ?’, ‘भिक्षापात्र अवलंबिने’, ‘शेतीस पाणी ; पाटाने की उपशाने?’, ‘भारतीय शेती व नियोजन’, ‘अन्न आणि स्वातंत्र्य’ इत्यादी लेख त्यांनी मराठीतून लिहिले आहेत. ‘गोमाता की धन’, ‘भारतीय बुद्धिवंतांची निर्यात’, ‘सरकारी सोडती’ हे त्यांचे गाजलेले लेख आहेत.
ग्रामीण भागात त्यांनी 'अंबर चरखा' सारखा पूरक व्यवसाय सुरू केला. त्यांनी ‘नोकर सहकारी योजना’ किंवा ‘शेतमजुरांची संघटना’ करायचे सुचवले, ज्या अन्वये त्यांना कोठेही काम करता येईल. त्यांनी धान्यं इतर राज्यात पाठविण्या ऐवजी त्याच राज्यात पुरेसे झाल्यानंतर मगच देशांमध्ये पाठवावे असे सुचविले. मर्यादित प्रमाणात पिकांचा विमा उतरवावा तसेच आर्थिक आणि समांतर शेतीसाठी पाणी कालव्याने व ते सुद्धा वर्षातील ८ महिने द्यावे असे सुचविले. यामागे उसासारख्या नगदी पिकासाठी पाण्याचा वापर मर्यादित प्रमाणात व्हावा हा हेतू होता. पशुधनाबाबत त्यांची मते रोखठोक होती. दूध उत्पादन स्थिर ठेवायचे असेल तर सर्वच वासरांना न जगवता काहींची कत्तल करणे जरुरीचे आहे तसेच निरुपयोगी जनावरांची कत्तल करावी, असे त्यांचे मत होते. काही संघटनांचा त्याला तीव्र विरोध होता.
गोखले इन्स्टिट्यूट मधून निवृत्त झाल्यावर साफ्रा आणि व्हॉन न्यूमनची मॉडेल्स व त्या अनुषंगाने पगारांची पद्धत व त्यासंबंधी विश्लेषणात्मक अर्थशास्त्राचा अभ्यास केला. सुरुवातीची दहा वर्षे त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न, प्राथमिक शिक्षणातील त्रुटी व गळती, डेमोग्राफिक सर्वेक्षण आणि आवका चे वर्गीकरण आदी मध्ये संख्याशास्त्राचा वापर केला. त्यांनी आयुष्यभर खादी वापरली, पण ते गांधीवादी नव्हते. नाटक व सिनेमा हे त्यांचे आवडीचे विषय होते. ज्योतिष आणि संगीतामध्ये त्यांना आवड होती. भारतीय शास्त्रीय संगीताची नोटेशन त्यांनी बनवली होती. ते तर्कशुद्ध व नवीन विचार करणारे होते. ते केवळ टीकाकर नव्हते तर नेहमी चांगला मार्ग काढत किंवा सूचना करीत. ते स्पष्टवक्ते होते त्यांना सभेत भाग घ्यायला व वादविवाद करायला आवडे. लिखान परिपूर्ण व निर्दोष असावे असा त्यांचा कटाक्ष असे व त्याबाबतीत ते तडजोड करत नसत. ते स्वतः धार्मिक नव्हते. परंतु, गणपतीवर त्यांची भक्ती होती. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. परंतु, प्रत्यक्षात ते एकटेच होते. त्यांच्याकडे आलेल्या पत्राला २४ तासाच्या अगोदर उत्तर दिले जायचे. वेळेबाबत ते दक्ष असत. असा बुद्धिमान, विद्वान, स्पष्टवक्ता संख्या शास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होणे दुर्मिळच. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली. (संकलित).
प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ, सांगली
९४२३८२९११७
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.