१५ दिवसांत एक लाखावर लसीकरण: राज्यात नागपूर तिसऱ्या स्थानी

    03-Aug-2022
Total Views |
 
corona
 
नागपूर:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला नागपुरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. अवघ्या १५ दिवसांत एक लाखावर लसीकरणाचे डोस शहरात देण्यात आलेले आहेत.
 
शहरात वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर शहरात लसीकरण मोहिमेला गती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात शहरात लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढविण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये १८ वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या नि:शुल्क लसीकरणामध्ये ‘हर घर दस्तक’ मोहिम सुद्धा राबविण्यात आली. पात्र सर्व व्यक्तींना घरी जाउन बुस्टर डोस देण्यात आले
 
 
.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुढील ७५ दिवस चालणा-या लसीकरण मोहिमेच्या सुरूवातीच्या १५ दिवसातच नागरिकांनी उत्तम प्रतिसादर दर्शविला आहे. मात्र कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी अद्यापही लसीकरणापासून वंचित असलेल्यांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
 
१५ ते ३१ जुलै या कालावधीमध्ये पहिला, दुसरा आणि बुस्टर असे एकूण १२१५७९ लसीकरणाचे डोस देण्यात आलेले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक १८१८१ बुस्टर डोस घेण्यात आले. तर पहिला डोस घेणा-यांची संख्या धरमपेठमध्ये जास्त आहे. धरमपेठ झोनअंतर्गत ११८७ नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणा-यांमध्ये लकडगंज झोनमधील नागरिक अग्रक्रमावर आहेत. लकडगंज झोन अंतर्गत २०४७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. शहरातील दहाही झोनमध्ये ५८५३ नागरिकांनी पहिला डोस घेतला तर १२८३३ एवढे दुसरा डोस आणि १०२८९३ एवढे बुस्टर डोस देण्यात आले आहेत. एकूणच १५ दिवसांत नागपूर शहरामध्ये १२१५७९ एवढे लसीकरणाचे तिनही डोस देण्यात आलेले आहेत.
 
शहरातील मनपाच्या आणि शासकीय केंद्रांवर नि:शुल्क लसीकरणाची सोय उपलब्ध असून दोन्ही डोस घेउन ६ महिन्याचा कालावधी झालेल्या १८ वर्षावरील प्रत्येकाने लगेच आपले बुस्टर डोसचे लसीकरण करून घ्यावे. याशिवाय अद्यापही ज्यांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नसेल त्यांनी लसीकरण करून स्वत:सह इतरांच्या सुरक्षेबाबत आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या बुस्टर डोस लसीकरणामध्ये नागपूर शहर आघाडीवर आहे. राज्यात नागपूर शहर तिस-या स्थानी आहे. पात्र व्यक्तींना बुस्टर डोस देण्यासाठी मनपाद्वारे विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या या पुढाकाराला नागरिकांकडून मिळणा-या प्रतिसादामुळे नागपूर शहराला ही आघाडी मिळविता आली आहे. राज्यात पहिल्या क्रमांकावर मुंबई (१२.५१ टक्के), दुस-या क्रमांकावर पूणे (१०.३९ टक्के) आणि नागपूर १०.३७ टक्क्यांसह तिस-या क्रमांकावर आहे. या यशाबद्दल मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसरा डोस घेउन सहा महिने पूर्ण झालेल्या सर्व व्यक्तींनी लवकरात-लवकर बुस्टर डोस घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.