...तरच जगातून दहशतवादाचा नायनाट होईल!

    03-Aug-2022
Total Views |

osama bin laden and Al Zawahiri (Image Source : Internet)
 
 
जगातील सर्वात मोठी आणि घातक दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदा या संघटनेचा प्रमुख अल जवाहिरीचा खातमा केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. अल जवाहिरी हा जगातील सर्वात खतरनाक असा दहशतवादी होता. ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूनंतर अल जवाहिरी हाच अल कायदाची सूत्रे सांभाळीत होता. अमेरिकेने अल जवाहिरीवर २५ दशलक्ष पौंडचे बक्षीस ठेवले होते. अमेरिकेवर झालेल्या ९/ ११ च्या हल्ल्यात त्याचा समावेश होता. या हल्ल्यात ३ हजारांहून अधिक निरपराध नागरिक ठार झाले होते.
 
 
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल जवाहिरीचा खातमा करण्याचा अमेरिकेने अनेकदा प्रयत्न केला. अल जवाहिरी ठार झाल्याच्या बातम्याही अनेकदा आल्या. पण त्या अफवा असल्याचे नंतर सिद्ध झाले. यावेळी मात्र स्वतः अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्याच्या मृत्यूची घोषणा केली असल्याने ती खरी असण्याचीच शक्यता आहे. अर्थात ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूनंतर त्याला कोठे दफन केले, हे अमेरिकेने जगाला अद्याप कळू दिले नाही. आताही अल जवाहिरीचा मृतदेह कोठे दफन केला जाईल, हे जगाला समजणार नाही. ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूनंतर आता अल जवाहिरी याचा देखील मृत्यू झाल्याने अल कायदाला मोठा झटका बसला आहे. ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूनंतर अल कायदाला बसलेला हा मोठा धक्का आहे.
 
 
अल जवाहिरी याला ठार करून अमेरिकेने दहशतवादा विरुद्धच्या लढाईत मोठा विजय मिळवला आहे. अल जवाहिरीच्या मृत्यूचे दूरगामी परिणाम होणार आहे. अल जवाहिरी याचा मृत्यू दहशतवाद विरुद्धच्या लढाईत एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. कारण त्याच्या मृत्यूनंतर अल कायदाचे नेटवर्क कमकुवत होणार आहे. त्यांना आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. इतकेच नाही तर इतर दहशतवादी संघटनांना देखील मोठा इशारा मिळाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांनीही चाप बसणार आहे.
 
 
ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्येच लपला होता. पाकिस्ताननेच त्याला आश्रय दिला होता. आता अमेरिकेने अल जवाहिरी याला अफगाणिस्तानात जाऊन मारले आहे. अल जारहिरी हा अफगाणिस्तानातील काबूल येथे लपून बसला होता. अमेरिकेने ड्रोन विमानांचा वापर करून त्याला ठार केले. आता अमेरिकेच्या निशाण्यावर अन्य दहशतवादी संघटना आणि त्या संघटनांचे प्रमुख आहे. अल जवाहिरी याच्या मृत्यूने अमेरिकेत आनंद व्यक्त होत आहे. अर्थात त्याला ठार करून अमेरिकेने मोठा विजय मिळवला असला तरी तो अंतिम नाही. कारण अल कायदा आता नव्या म्होरक्यानिशी पुन्हा सक्रिय होईल. त्यामुळे अमेरिकेला सजग राहावे लागेल.
 
 
अमेरिकेने लादेन, जवाहिरी यांच्या सारख्या दहशतवाद्यांना ढगात पाठवण्यासोबतच त्यांना पाठबळ देणाऱ्या देशांविरुद्ध देखील कडक धोरण स्विकारायला हवे. पाकिस्तान, अफगाणिस्तान हे देश कायम दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आले आहेत. पाकिस्तानने लादेनला तर अफगाणिस्तानने जवाहिरीला आश्रय दिला. म्हणजे हे देश दहशतवाद्यांना उघडपणे सहकार्य करत आहे. या देशांमुळेच जगात दशतवाद वाढत आहे. दहशतवाद्यांसोबतच दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तान, अफगाणिस्तान सारख्या देशांविरुद्धही कडक भूमिका घेण्याची वेळ आली आहे. या देशांना जर जरब बसली तरच जगातून दहशतवादाचा नायनाट होईल.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.