रा.तू.म. नागपूर विद्यापीठाकडून महानुभाव साहित्याची अवहेलना

    02-Aug-2022
Total Views |
rtmnu 
नागपूर:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महानुभाव साहित्याचा ग्रंथ स्वतंत्र रुपाने बी.ए.च्या अभ्यासक्रमात परंपरेने सतत राहत आला आहे. परंतु, आता तो मराठी साहित्यातून बी.ए.करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात येणार नाही. कारण बी.ए.च्या अभ्यासक्रमातून महानुभावाचे स्वतंत्र साहित्यच वगळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे आमच्या महानुभाव पंथीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
 
नागपूर विद्यापीठाला महानुभाव साहित्य अभ्यासकांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. त्यामुळेच शासनाच्या निर्देशानुसार दोन वर्षांआधी विद्यापीठात भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन स्थापन केले गेले. त्याला शहराच्या मध्यभागी विद्यापीठाचा परिसर उपलब्ध करून देण्यात आला.
महानुभाव साहित्याची विशेष दखल घेण्यात यावी. त्यावर सखोल संशोधन संपादन अभ्यास करण्यात यावा व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, मूल्यांचा प्रचार, प्रसार व्हावा. हा अध्यासन निर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे. विद्यापीठात गेल्या शतकभरात बी.ए.आणि एम.ए. च्या विद्याथ्यांना आय मराठी महानुभाव साहित्याचा अभ्यास करणे अनिवार्य होते परंतु यावर्षी महानुभाव साहित्याला बी.ए.च्या अभ्यासक्रमातून हद्दपार केल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर मराठी साहित्याचा अभ्यास करणारे बी. ए. चे विद्यार्थी असताना त्यांना साधी महानुभाव साहित्याची ओळखसुद्धा होऊ नये, असा तर त्यामागे हेतू नाही ना? अशी शंका आहे.
आजवर महानुभाव साहित्याचा कुठलाही एखादा ग्रंथ स्वतंत्रपणे अभ्यासक्रमात राहत असे. त्यामुळे साहित्याचा एकूण अभ्यास व्हायचा. परंतु तसे न करता संपूर्ण साहित्य केवळ एका धड्यापुरते मर्यादित करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार संतापजनकच आहे. महानुभाव साहित्याचा आजवर ज्या प्राधान्याने अभ्यासक्रमात समावेश केला जायचा, त्याच प्राधान्याने पुन्हा तो समावेश करुन घ्यावा. तसे न झाल्यास महानुभाव पंथीय रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. असा इशारा नरेंद्र खेडीकर, अध्यक्ष श्रीदत्तात्रेय प्रभू नवयुवक महानुभाव मंडळ, कुंदनलाल गुप्ता नगर, उत्तर नागपूर यांनी दिला आहे.