मिराबाई चानूचा प्रेरणादायी प्रवास

    02-Aug-2022
Total Views |

mirabai chanu (Image Source : Twitter)
 
 
 
भारताची आघाडीची ऑलिम्पिकपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने बर्मिंगहम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात ८८ किलो वजन उचलून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. विशेष म्हणजे मागील २०१८ साली गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते. सलग दोन राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिकून मीराबाईने इतिहास रचला आहे. अर्थात मोठ्या स्पर्धेत पदक जिंकण्याची तिला आता सवयच झाली आहे.
 
मागील वर्षी जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानू हिने रौप्य पदकाची कमाई केली होती. मीराबाई चानूच्या या राष्ट्रकुलमधील या सुवर्णपदकाने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना, पाऊस, ढगफुटी, महापूर, दरडी कोसळणे यासारख्या घटनांनी त्रासलेल्या देशवासियांना मीराबाई चानुने जल्लोष करण्याची संधी मिळवून दिली, याबद्दल तिचे आभारच मानावे लागेल. वेटलिफ्टिंग सारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या खेळात ऑलम्पिक, राष्ट्रकुल सारख्या मोठ्या स्पर्धेत पदक जिंकणे ही खूप मोठी कामगीरी आहे.
 
मणिपूर राज्यातील एका छोट्या गावातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईचा सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. ८ ऑगस्ट १९९४ ला मणिपूर इथल्या छोट्या गावात मीराबाई हिचा जन्म झाला. इंफाळपासून तिचे गाव २०० किलोमीटर दूर होते. त्याकाळी मणिपूरच्याच वेटलिफ्टर कुंजुराणी देवी स्टार होत्या आणि अथेन्स ऑलिंपिक खेळायला गेल्या होत्या. त्यांचा आदर्श मिराबाईने घेतला आणि सहा भावंडात सर्वात छोटी असलेल्या मिराबाईने वेटलिफ्टर बनण्याचा निश्चिय केला. २००७ झाली मिराबाईने जेव्हा वेटलिफ्टिंगचा सराव सुरू केला, तेव्हा लोखंडाचा बार नसल्याने बांबूच्या बारने सराव केला. गावात प्रशिक्षणाची सुविधा नसल्याने गावापासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील गावात जाऊन प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
 
गरीब कुटुंबात जन्मलेल्या मिराबाईकडे अंडी, मटण, चिकन यासारखा महागडा आहार करण्यास देखील पैसे नसायचे. तरीही तिने सराव सुरू ठेवला. कठोर मेहनत घेतली आणि त्याचे फळ तिला मिळाले. ती अंडर १५ आणि अंडर १७ ची ज्युनियर चॅम्पियन बनली. ज्या कुंजुराणी देवी यांना तिने आदर्श मानला, त्याच कुंजुराणी देवी यांचा १२ वर्षाचा विक्रम तिने १९२ किलो वजन उचलून मोडीत काढला. तिने रियो ऑलिम्पिकची तयारी सुरू केली. मात्र, पुरेशा साधन समुग्रीच्या अभावी रियो ऑलिंपिकला पात्र ठरण्यास तिला अपयश आले. २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये मिराबाईला वजन उचलता आले नाही. ऐनवेळी तिचा हात आखडला. त्यामुळे तिला पदक जिंकता आले नाही. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये अपयश आल्याने ती निराश झाली. पण डगमगली नाही. अनेकांनी तिला खेळ सोडण्याचा सल्ला दिला. पण तिने हार मानली नाही. उलट आणखी जोमात सराव सुरू केला. त्यामुळे तिला तिचा हरवलेला फॉर्म गवसला.
 
४८ किलो वजनाच्या मीराबाईने तिच्या चारपट अधिक म्हणजे १९४ किलो वजन उचलत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले. या सुवर्णपदकाच्या जोरावरच तिने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. रियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश न मिळाल्याने निराश झालेल्या मिराबाईने ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवायचाच, इतकेच नाही तर देशासाठी पदकही मिळवायचे, असे स्वप्न पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने रात्रीचा दिवस केला. त्याचे फळ तिला मिळाले आणि सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे स्वप्न साकार झाले. त्या यशावरही ती समाधानी राहिली नाही. देशासाठी आणखी पदक करण्याचा निश्चय तिने केला. आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तो निश्चयही तिने पूर्ण केला. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि करून दाखवण्याची धमक असल्यास जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे मिराबाईने दाखवून दिले. मिराबाईच्या या पदकाने देशातील महिला खेळाडू वेटलिफ्टिंग सारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या खेळाकडे वळतील. मीराबाई देशातील महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे. मीराबाईचे मनापासून अभिनंदन!
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.