असा असणार मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा; सपत्नीक करणार श्री विठ्ठलाची महापूजा

    08-Jul-2022
Total Views |

shri vitthal maha puja (Image Source : Internet)
 
मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेला राजकीय पेच निवळला आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे यावर्षी श्री विठुरायाची महापूजा कोण करणार ही चर्चा देखील संपली. परंपरेनुसार पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांचा पंढरपूर दौरा कार्यक्रम देखील ठरला आहे.
 
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
 
मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
 
१. शनिवार ९ जुलै रोजी पुणे येथून मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण. पंढरपूर येथे रात्री ११.३० वाजता आगमन व शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आयोजित 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थिती.
२. रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेसाठी उपस्थिती.
३. पहाटे ५.३० वाजता विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन.
४. पहाटे ५.४५ वाजता नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी ११.१५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील 'सुंदर माझे कार्यालय' या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास उपस्थिती.
५. सकाळी ११.४५ वाजता पंचायत समिती पंढरपूर येथे 'स्वच्छता दिंडी' समारोपास उपस्थिती. दुपारी १२.३० वाजता पक्ष मेळाव्यास उपस्थिती.
६. दुपारी ३ वाजता मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायं. ४.३० वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व ठाण्याकडे प्रयाण.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.