उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद !

    31-Jul-2022
Total Views |
 
as
 
हिंदी आणि उर्दू साहित्यातील ख्यातनाम लेखक, उपन्यास सम्राट आणि आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह म्हणून ओळखले जाणारे मुंशी प्रेमचंद यांचा ३१ जुलै हा जन्मदिन. ‘गोदान’ ही त्यांची अमर कलाकृती भारतीय कृषक जीवनाचे महाकार्य म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या कथा-कादंबरीतील माणूस आपल्या मातीशी,परंपरांशी,संस्कृतीशी नाळ जोडणारा असल्याने जिवंत वाटतो. प्रेमचंदांनी १९१३ ते १९३१ या कालावधीमध्ये एकूण २२४ कथा , १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या.
 
हिंदी कादंबरीकार आणि कथालेखक मुंशी प्रेमचंद यांचा जन्म ३१ जुलै १८८० रोजी उत्तर प्रदेशातील लमही या गावी झाला. त्यांचे मूळ नाव धनपतराय श्रीवास्तव असे होते. त्यांच्या साहित्यिक जीवनाची सुरुवात १९०१ मध्ये झाली. नबाब राय या टोपण नावाने लेखन करणाऱ्या या प्रतिभावंताची पहिली हिंदी कथा सरस्वती पत्रिकेच्या डिसेंबर १९१५ च्या अंका मध्ये 'सौत' या नावाने प्रकाशित झाली.
 
१९०९ मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा देशभक्तीपर कथासंग्रह 'सौजे वतन' राष्ट्रवादी भावनेने ओतप्रोत असल्याने इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली व अशा प्रकारचे लेखन न करण्याचे निर्देश दिले. यामुळे शिक्षण खात्यात नोकरी करीत असलेल्या प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन १९२१ साली नोकरी सोडली व ते बनारसला परतले. त्यानंतर त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले. त्यांनी आपली पहिली कादंबरी हिंदुस्थानवरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमावर आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त झाली. त्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून प्रेमचंद हे नाव धारण केले. 'प्रेमचंद' या नावाने त्यांची पहिली कथा 'बड़े घर की बेटी’ , 'ज़माना’ पत्रिके च्या डिसेंबर १९१० च्या अंकात प्रकाशित झाली. १९२३ मध्ये त्यांनी 'सरस्वती प्रेस'ची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपट कथा लिहून दिली. तसेच चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरातच मुंबईहून प्रेमचंद परत गेले.
 
प्रेमचंद यांनी काही महिने 'मर्यादा’ पत्रिकेचे संपादन केले. तर सहा वर्षे ते 'माधुरी' या पत्रिकेचे संपादक म्हणून काम पाहीले. १९३० मध्ये त्यांनी बनारस येथून आपले मासिक पत्र 'हंस' सुरू केले आणि १९३२ च्या सुमारास जागरण नावाने एक साप्ताहिक काढले. १९३४ साली प्रदर्शित मजदूर या चित्रपटाची कथा त्यांनी लिहिली. त्यांनी हिंदीमध्ये १९१५ पासून कथा लिहिल्या आणि १९१८ च्या 'सेवासदन' पासून कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. त्यांची पहिली कादंबरी 'असरारे महाबिद' उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक 'आवाज-ए-ख़ल्क' मध्ये ८ ऑक्टोबर १९०३ पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी 'मंगलसूत्र' अपूर्ण राहिली. त्यांची शेवटची कथा 'कफन' १९३६ मध्ये प्रकाशित झाली.
 
प्रेमचंदांच्या सेवासदन (१९१८), प्रेमाश्रम (१९२२), रंगभूमी (१९२४), निर्मला (१९२७), कायाकल्प (१९२८), गबन (१९३०), कर्मभूमी(१९३२), गोदान (१९३६) या कादंबऱ्या महत्वाच्या मानल्या जातात. गोदान कादंबरी म्हणजे प्रेमचंदांची अमर कलाकृती. जरी भारतीय कृषक जीवनाचे महाकाव्य म्हणून ती गौरविली जात असली तरी ते अर्धसत्य आहे.
 
गोदान मध्ये कृषकांबरोबर जमीनदार वर्ग, मध्यम वर्ग, महाजन वर्ग व उद्योगपतींचा वर्ग यांचे बारकाव्यांनिशी वर्णन केले आहे. ‘प्रेमचंद : कलम के सिपाही’ या त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्रामध्ये त्यांनी २२४ कथा लिहील्याचा उल्लेख आहे. त्यांच्या कथांचे २४ संग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांच्या सर्व कथा ‘मानसरोवर’ नावाने आठ खंडांत प्रसिद्ध झाल्या आहेत (१९६०). त्यांच्या गाजलेल्या कथा-कादंबऱ्यांचे अनेक आधुनिक भारतीय भाषांमध्ये तसेच काही युरोपीय भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. त्यांनी संग्राम, करबला, व प्रेम की वेदी ही तीन नाटके लिहिली असून काही चरित्रे, वाड:मयीन व अन्य विषयांवर निबंध लिहिले आहेत. टॉलस्टॉय व इतरांच्या कथांचे, गॉल्झवर्दी व शॉच्या काही नाटकांचे हिंदीत अनुवादही केले आहेत. काही बालसाहित्याची निर्मितीही त्यांनी केली आहे. तथापि त्यांचे महत्वाचे कार्य कथा व कादंबरी क्षेत्रातच मानले जात असल्याने त्यांना ‘उपन्यास सम्राट’ असे संबोधले जाते.
 
प्रेमचंदांचा साहित्यविषयक दृष्टीकोन ध्येयवादी होता. साहित्याचे ध्येय मनोरंजन नसून जीवनाचे दर्शन घडविणे व लोकांच्या सद्भिरुचीचे पोषण करून त्यांची मांगल्यावरील श्रद्धा वाढेल असे संस्कार करणे असल्याचे त्यांचे मत होते. जीवनातील विषण्णता,विसंगती, अव्यवस्था,शोषण, फसवणूक यांचे वास्तववादी चित्रण करून जनतेला संघर्षासाठी मानसिक दृष्ट्या तयार करण्याचे महत्वाचे कार्य लेखकाने केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. हे त्यांच्या साहित्यातून दिसून येते. प्रेमचंद अत्यंत जागरूक लेखक होते. व्यापक सर्वस्पर्शी सहानुभूती हा त्यांचा महनीय गुण होता. भिकाऱ्यांपासून राजा-महाराजांपर्यंत, शेतकऱ्यांपासून मोठ्या जमिनदारांपर्यंत, अशिक्षित स्त्रियांपासून उच्च विद्याविभूषित स्त्रियांपर्यंत, बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व प्रकारची पात्रे प्रेमचंदांनी कलात्मक सहानुभूतीने चित्रित केली आहेत.
 
सुधारणावादी, गांधीवादी तसेच समाजवादी विचारसरणीचा त्यांच्या लेखनावर प्रभाव होता तथापि ते कोणत्याही विचारसरणीशी जोडले गेले नाहीत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते राष्ट्रवादी राहिले. त्यांनी भारतातील विविध जाती- धर्माच्या, वर्गाच्या समस्यात्मक जीवनाचे चित्रण ताकदीने केले असून त्यांच्या काही कथा-कादंबऱ्यांवर गरीब मजदूर, हिरा मोती, सेवासदन, गबन, शतरंज के खिलाडी, आदी चित्रपट निघाले आहेत. प्रेमचंदांनी हिंदी साहित्य अनेक प्रकारे संपन्न केले असून समृद्ध गद्यभाषा ही त्यांनी हिंदी साहित्याला दिलेली एक मोठी देणगी आहे. त्यांनी दाखविलेल्या वास्तववादी वाटेवरून वाटचाल करीत आज हिंदी साहित्य समृद्ध होत असलेचे दिसते. हिंदी व उर्दू साहित्यातील त्यांचे योगदान अविस्मरणणीय आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !
 
प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ, सांगली
९४२३८२९११७
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.