वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक

    29-Jul-2022
Total Views |

public hygiene (Image Source : Internet)
 
राज्यातून कोरोना अजूनही हद्दपार झालेला नाही. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटू लागली, तरी कोरोनाचे रोज नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना अजून पूर्णपणे हद्दपार झाला नसतानाच आता राज्यात 'स्वाईन फ्ल्यू'चे रुग्णही आढळून येत आहेत. स्वाईन फ्ल्यू ग्रस्त काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. कोरोना आणि स्वाईन फ्ल्यूने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रात आता साथीच्या आजाराने देखील डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून राज्यात डेंग्यू, चिकणगुणिया आणि मलेरिया या साथीच्या आजाराने कहर केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणियाचे शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय सर्दी, डोकेदुखी, ताप, शिंका येणे यानेही नागरिक त्रस्त आहेत. कोरोनातून आता कुठे उसंत मिळत असतानाच साथीचे आजार वाढल्याने आरोग्य व्यवस्थेची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना, स्वाईन फ्ल्यूशी दोन हात करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला आता या आजारांशीही दोन हात करावे लागत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. डेंग्यू, चिकणगुणिया आणि मलेरिया या साथीच्या आजारांशी आरोग्य यंत्रणा तर दोन हात करतच आहे. पण आरोग्य यंत्रणेसोबतच नागरिकांनी आणि प्रशासनानेही ही साथ आणखी वाढू नये याबाबत काळजी घ्यायला हवी.
 
वास्तविक दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, साथीचे आजार पसरतात. पण ते पसरुच नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच खबरदारी घेतली जात नाही. या साथीबाबत नगरपालिका असो की महानगर पालिका उदासीनच दिसून येते. दरवर्षी कचऱ्याचे ढीग, घाणीचे साम्राज्य, सांडपाण्याचे डबके यांचे वेळीच सर्वेक्षण केले जात नाही. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याचे डबके आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. याची वेळीच विल्हेवाट लावली गेली असती तर आज ही वेळ आली नसती. डेंग्यू, चिकणगुणिया, मलेरिया या सारखे साथीचे आजार हे डासांमुळे होतात. ज्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य असते, अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. शहरातील हे घाणीचे साम्राज्य कमी झाले की डासांचे प्रमाणही कमी होईल. प्रशासनाने शहरातील घाणीचे साम्राज्य कमी करण्यासाठी तसेच शहरातील कचऱ्याचे ढीग पसरू नयेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत. तसेच शहरात सर्वत्र फवारणी करावी.
 
डेंग्यूला कारणीभूत ठरणारा एडिस इजिप्ती हा डास गोड्या पाण्यात राहतो. डेंग्यूचे डास पसरू नयेत यासाठी नगरिकांनीही विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात, छतावर, भांड्यामध्ये, जुन्या वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या घराचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. याशिवाय नागरिकांनी सकस आहार घेणे, भरपूर पाणी, ज्यूस पिणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, आराम करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांकडून तपासून घेणे आवश्यक आहे. कोणताही आजार किरकोळ म्हणून अंगावर काढणे धोकेदायक ठरू शकते. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेपासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत विशेष काळजी घ्यावी. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मिडियाद्वारे याबाबत जनजागृती करावी. शाळा महाविद्यालयातही याबाबत प्रबोधन करावे. वैयक्तिक, सामूहिक व शासकीय पातळीवर व्यापक प्रयत्न करूनच साथीच्या आजाराशी दोन हात करता येईल.
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५


*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.