धक्कादायक! ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार; ९ जणांना अटक

    29-Jul-2022
Total Views |

gang rape (Image Source : Internet)
 
नागपूर :
नागपूर जिल्ह्यात पुन्हा माणुसकीला लाज आणणारी घटना घडली आहे. नागपूर शहरापासून जवळपास ६० किमी अंतरावर असलेल्या उमरेड शहरात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर महिनाभर सतत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बातमी गुरुवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. पीडित मुलीचे आई-वडील मजूर असून या प्रकरणातील मुख्य आरोपी हा अल्पवयीन मुलीच्या घराजवळच राहतो.
 
 
 
नागपूर ग्रामीण पोलिसांतील उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, उमरेड शहरात ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे. एका हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान ही माहिती समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले. उमरेड शहरात १९ जून ते १५ जुलैदरम्यान ही घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले. रोशन करगावकर (२९) आणि त्याचे मित्र गजानन मुरस्कर (४०), प्रेमदास गाठबांधे (३८), राकेश महाकाळकर (२४), गोविंदा नाटे (२२), सौरभ उर्फ करण रिठे (२२) नितेश फुकट (३०), प्रद्युम्न करूतकर (२२) आणि निखिल उर्फ पिंकू नरुळे (२४) अशी आरोपींची नावे आहेत.
 
महत्वाचे म्हणजे अशा घटना घडू नये, याकरिता महाविकास आघाडी सरकारने 'शक्ती कायदा' आणला होता. तो कायदा सध्याच्या राज्यकर्त्यांनी अस्तित्वात आणावा, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
घटनेबाबत माहिती देताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, नागपूर येथील उमरेड शहरातील ११ वर्षीय मुलीवर ती राहत असलेल्या परिसरातील आरोपी रोशन कारगाकर १९ जून रोजी पीडितेच्या घरी गेला आणि तिला सोबत त्याच्या घरी येण्यास सांगितले. ती त्याच्यासोबत घरी गेली असता तेथे करगावकर आणि मुरस्कर यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास पीडित मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला ३०० रुपये देऊन आरोपीच्या इतर साथीदारांनी काही दिवसांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. जवळपास एक महिना अल्पवयीन मुलीवर बलात्कार होत राहिला. पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यावर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपींना काही तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
पुढे त्या म्हणाल्या, राज्यातील अनेक भागात महिलांवरील अन्याय अत्याचाराचा घटना घडत आहेत. त्या रोखण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'शक्ती कायदा' आणला. हा कायदा सर्व आमदारांनी एकमताने मंजूर करून अंतिम मंजुरी करिता राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला. मात्र त्याला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सध्याच्या राज्य सरकारने अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी देखील नीलम गोर्हे यांनी यावेळी केली. याशिवाय ११ वर्षीय पीडित मुलीला सर्वतोपरी मदत करण्यात यावी आणि आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
 
तसेच यावेळी नीलम गोऱ्हे यांनी नागपुर ग्रामीण अतिरिक्त कार्यभार पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याशी दूरधवनीवरून संवाद साधला असता ते म्हणाले की, पीडित ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना समोर येताच, आम्ही ९ आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर पीडित मुलीचे समुपदेशन सुरू आहे. त्याचबरोबर पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.