IFFM 2022 : अभिषेक बच्चन, कपिल देव ऑस्ट्रेलियात फडकवणार तिरंगा

27 Jul 2022 18:35:00

abhishek bachchan & kapil dev (Image Source : Internet)
 
मुंबई :
आगामी महिन्यात होऊ घातलेल्या मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात भारतासाठी अभिमानास्पद बाब ठरेल असे कार्य करण्याचे सौभाग्य बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना लाभले आहे. अभिषेक बच्चन आणि कपिल देव यांना ऑट्रेलियाच्या धर्तीवर मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात (Indian Film Festival of Melbourne) तिरंगा फडकवण्याचा मान मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशासाठी ही गर्वाची बाब आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेलबर्नमधील भारतीय चित्रपट महोत्सवात अभिषेक बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याबाबत बोलताना अभिषेकने सांगितले की, चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. कपिल सरांसोबत हे व्यासपीठ शेअर करणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मैत्रीचेही ते प्रतीक आहे. सिनेमा आणि क्रिकेटने नेहमीच भारतीयांना जोडले आहे. अशा परिस्थितीत इतक्या लोकांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करणे ही अभिमानाची बाब असल्याची भावना अभिषेक बच्चन यावे व्यक्त केली.
ही बातमी समोर आल्यापासून अभिषेक आणि कपिल देव या दोघांवरही सर्वस्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे मेलबर्नमधील भारतीय चित्रपट महोत्सव हा एक असा कार्यक्रम आहे, जेथे संपूर्ण ऑस्ट्रेलियातील विविध पार्श्‍वभूमीतील भारतीय भारताच्या स्‍वातंत्र्याची ७५ वर्षे साजरा करण्‍यासाठी एकत्र येतील.
 
दरम्यान, ऑस्ट्रेलियन लोकांना भारतीय चित्रपट आणि क्रिकेटची आवड असल्याने यंदा अभिषेक बच्चन आणि क्रिकेट विश्वचषक विजेता कपिल देव यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मेलबर्नचा भारतीय चित्रपट महोत्सव १२ ते २० ऑगस्ट दरम्यान होणार आहे. महत्वाचे म्हणजे भारताबाहेर होणारा हा सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे आणि ऑस्ट्रेलियन सरकार हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत करत आहे.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Powered By Sangraha 9.0