मंकीपॉक्सचा धोका वाढतोय! अशी बाळगा खबरदारी

    25-Jul-2022
Total Views |
 
monkeypox disease (Image Source : Internet)
 
 
कोरोना विषाणूचा धोका अद्याप कमी झालेला नसताना आता मंकीपॉक्स आजाराने आपले डोके वर काढले आहे. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण ४ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र, योग्य खबरदारी बाळगल्यास या आजारावर नियंत्रण देखील ठेवता येते.
  
भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रुग्ण २ ते ४ आठवड्यात बरा होतो. तथापि, लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करु शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम या आजाराविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.
 
मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य आजार असून १९७० मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो या देशात आढळला होता. ‘ऑर्थोपॉक्स व्हायरस’ या डीएनए (DNA) प्रकारच्या विषाणूमुळे हा आजार होतो. तसेच काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये विषाणू आढळून आल्यामुळे हे प्राणी या विषाणूचा नैसर्गिक स्त्रोत आहेत.
 
मंकीपॉक्सची लक्षणे
ताप येणे, लसिका ग्रंथींना (कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथी) सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला या प्रकारची लक्षणे रुग्णामध्ये आढळून येतात. कुपोषण, कृमी प्रादुर्भाव अणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या समूदायामध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरुप धारण करु शकतो.
 
कांजण्या, नागीण, गोवर, सिफिलिस दुसरी स्टेज, हँड, फूट माऊथ डिसीज इत्यादी मंकीपॉक्स सदृश इतर आजार आहेत. मंकीपॉक्स आजारामुळे न्यूमोनिया, सेप्सिस, मेंदूतील गुंतागुंत, दृष्टीपटलाचा संसर्ग (यामध्ये दृष्टी जाऊदेखील शकते) आदी गुतांगूत निर्माण होऊ शकते. या आजाराचा मृत्युदर सर्वसाधारणपणे ३ ते ६ टक्के आहे.
 
मंकीपॉक्सचा कालावधी
आजाराचा अधिशयन कालावधी ६ ते १३ दिवस असला तरी हा कालावधी ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकतो. संसर्गजन्य कालावधी अंगावर पुरळ उठण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे बरे होईपर्यंत असतो. असा बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य रुग्ण असतो.
 
मंकीपॉक्सचा प्रसार
व्यक्ती-व्यक्तीमध्ये थेट शारीरिक संपर्क येतांना शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव, तसेच बाधित व्यक्तींनी वापरलेल्या कपड्यापासून, जास्तीत जास्त वेळ बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे इतर व्यक्तीला संसर्ग होते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. मधुमेह, रक्तदाब, प्रतिकार कमी असलेल्या व्यक्तीला मंकीपॉक्स आजार होण्याची शक्यता जास्त आहे.
 
संशयित रुग्णांची ओळख
मागील ३ आठवड्यात मंकीपॉक्स बाधित देशांमध्ये किंवा राज्यामध्ये प्रवास केलेल्या व्यक्तीमध्ये शरीरावर अचानक पुरळ उठणे, सूजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा अशी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीला संशयित रुग्ण म्हणून ओळखले जाते.
 
संभाव्य रुग्ण : ज्या कारणाने या आजाराचा प्रसार, संसर्ग होतो अशा प्रकारचा संपर्क संशयित रुग्णांशी आलेली व्यक्ती संभाव्य रुग्ण मानण्यात येते.
 
निश्चित निदान तंत्र
प्रयोगशाळेत पीसीआर (PCR) चाचणी अथवा सिक्वेन्सिंगद्वारे या आजाराचे निदान केले जाते. मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी निदान झालेल्या रुग्णाच्या कपड्यांशी अथवा अंथरुण-पांघरुणाशी संपर्क येऊ न देणे, हातांची स्वच्छता ठेवणे, आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुणांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे आदी काळजी घ्यावी.
 
मंकीपॉक्स सर्वेक्षण
मंकीपॉक्सचा एक रुग्ण देखील साथरोगाचा उद्रेक असल्यास पूरक आहे. अशा प्रत्येक रुग्णाचे अन्वेषण शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या रुग्णांचे रक्त, रक्तद्रव, फुटकळ्यातील द्रव आणि मूत्र हे नमुने संकलित करुन पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थतेत पुढील चाचणीसाठी पाठविण्यात येतील. प्रत्येक बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
 
रुग्ण व्यवस्थापन आणि विलगीकरण
मंकीपॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात किंवा घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवावे. या ठिकाणी स्वतंत्र वायुविजन व्यवस्था असावी. रुग्णाने त्रिस्तरीय मुखपट्टीचा (ट्रिपल लेयर मास्क) वापर करावा. कातडीवरील पुरळ, फोड नीट झाकण्यासाठी त्याने लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पॅन्ट असा पोषाख वापरावा. जोपर्यंत रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्णपणे बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाही तोपर्यंत त्याला विलगीकरणात ठेवावे. पुरेशा प्रमाणात हायड्रेशन मिळेल याची दक्षता घ्यावी.
 
तज्ञांचा सल्ला
डोळ्यात वेदना होणे अथवा दृष्टी अधू होणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा छातीत दुखणे, शुद्ध हरवणे, झटके येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, रुग्ण तोंडावाडे अन्न-पाणी न घेणे, रुग्णास प्रचंड थकवा जाणवणे, अशा स्वरुपाची लक्षणे रुग्णामध्ये आढळल्यास तात्काळ तज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा रुग्णांना पुढील योग्य उपचारांसाठी संदर्भित केले जाणार आहे.
 
अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. परंतुमी, काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या वेळी ज्याप्रमाणे आपण नियमांचे पालन करीत होतो, त्याचप्रमाणे सर्वांनी नियमांचे पालन करावे. आपल्या भागात एखादी मंकीपॉक्ससदृश लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास तात्काळ विलगीकरण करावे. तसेच जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे. आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे पुणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी सांगितले.
 
 
 
जिल्हा माहिती कार्यालय, पुणे
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.