स्वातंत्र्यलढ्याचे आद्यप्रवर्तक : लोकमान्य टिळक!

23 Jul 2022 11:05:55
 
lokmanya baal gangadhar tilak
 (Image Source : Internet)
 
 
भारतावर इंग्रजांचे वर्चस्व असताना भारतभूमीस इंग्रजांच्या गुलामगिरीच्या पाशातून सोडविण्यासाठी अहोरात्र झटणारी काही नररत्ने आपल्या देशात होऊन गेली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे त्यातीलच एक दैदिप्यमान रत्न! त्यांच्या जयंतीदिनानिमित्त एका कणखर आणि जाज्वल्य नेतृत्वाचा थोडक्यात परिचय...
स्वदेशी, बहिष्कार, शिक्षण आणि स्वराज्य या चतु:सूत्रीचा टिळकांनी नेहमीच पुरस्कार केला. ते हिंदुस्थानातील राजकीय असंतोषाचे जनक तसेच आधुनिक भारताचे एक शिल्पकार होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंहगर्जना करणाऱ्या टिळकांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ब्रिटीशांशी लढण्यात घालविले. कुशाग्र बुद्धीमत्तेचे, प्रखर देशभक्त, निर्भीड पत्रकार, लेखक आणि स्पष्टवक्ते असणाऱ्या, अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव या कार्यक्रमांची सुरुवात करून लोकांमध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद निर्माण केला. ब्रिटीशांनी ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे बिरुद दिलेल्या टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि उत्कर्षासाठी ‘शिक्षण’ ही मुलभूत गरज मानून ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरु करून लोकांना संघटीत आणि शिक्षित केले तर ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना करून तरुणांना देशप्रेमाची शिकवण दिली.
२३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरी येथे लोकमान्यांचा जन्म झाला. पुत्र प्राप्तीसाठी मातेने उपवास आणि कठीण व्रत केले आणि सूर्यदेवाच्या कृपाप्रसादाने जन्मलेल्या या बाळाने ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अस्त घडवून आणला. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या टिळकांचे विचार स्वतंत्र आणि वेगळे होते. गणित हा त्यांचा आवडता विषय. कितीतरी कठीण गणिते ते सहजपणे सोडवत असत. तथापि, स्पष्टवक्तेपणामुळे शिक्षकांना ते आवडत नसत. ते शाळेत असतानाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा शिक्षक वर्गात नसताना काही मुलांनी शेंगा खाऊन टरफले वर्गातच टाकली होती. शिक्षकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी रागावून टरफलांविषयी विचारले असता कुणीच स्वत:हून पुढे येईना. तेव्हा त्यांनी वर्गातील सर्व मुलांना टरफले उचलण्यास सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलण्यास नकार दिला. 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही' असे बाणेदार उत्तर त्यांनी दिले.
 
प्रकृतीने अशक्त असणाऱ्या टिळकांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेऊन प्रकृती बळकट केली आणि सर्व खेळांत प्रथम क्रमांक पटकावला. ते उत्तम मल्ल आणि पोहणारे म्हणून नावाजले गेले. १८७७ मध्ये टिळक गणितात प्रथम वर्गामध्ये बीए (BA) झाले. पुढे त्यांनी एलएलबी (LLB) ही पदवी संपादन केली. तथापि नोकरी न करता आगरकरांच्या सहकार्याने १८८० मध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. लोकांना संघटीत करून इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना तयार केले. बालविवाहाला विरोध, विधवाविवाह आदी सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध संघर्ष केला. नंतरच्या काळात दोघांमध्ये तात्त्विक मतभेद झाल्याने टिळकांनी कर्जासह 'केसरी'चे संपादकपद स्वतःकडे घेतले. टिळकांचे अग्रलेख हाच 'केसरी'चा आत्मा होता. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय', 'उजाडले पण सूर्य कुठे आहे,' 'टिळक सुटले पुढे काय', 'प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल', 'टोणग्याचे आचळ', 'हे आमचे गुरूच नव्हेत’, 'बादशहा ब्राह्मण झाले', ‘पुनश्च हरि ॐ! हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख. टिळक हे सुरुवातीपासूनच जहालमतवादी असल्याने त्यांनी १८९० मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करताच पक्षाच्या मवाळ विचारसरणीला विरोध केला. काँग्रेस पक्षातील लाला लजपतराय, आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते त्यांच्याशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले व पुढे हे त्रिकुट देशाच्या राजकारणात बरेच गाजले. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेला ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ अक्षय विचारधन असून त्यात त्यांनी ज्या कर्मयोगाचा पुरस्कार केला आहे तो प्रत्यक्ष जीवनात त्यांनी आचरणात आणला.
गणिताचा व्यासंग :
टिळकांना गणित विषयापैकी बीजभूमिती (Analytical Geometry) हा विषय विशेष आवडे. त्यांची अभ्यास करण्याची पद्धती अनालीटीकल म्हणजेच विवेचक बुद्धीची असे. केवळ पुस्तकातील विवेचनाने संतुष्ट न होता, स्वतः विषयाचे उभे-आडवे विभाग पाडून स्वतःची बुद्धी चालवून ते त्या विषयाची काहीतरी नवीन मांडणी करीत. कॅल्कुलस वर ग्रंथ लिहिण्याचे ही टिळकांच्या मनात होते. यासंबंधी ते स्वतंत्र उपपत्ती बसवत असून, ती पूर्ण झाल्यावर इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे उल्लेख आढळतात. पुणे येथील केसरी ग्रंथालयातील उपलब्ध लोकमान्यांच्या एका वहीमध्ये (२५ ऑगस्ट १९१०) भूमितीत ज्या वक्रास विवृत्त (ellipses) म्हणतात, त्याच्या काही गुणधर्मांची ते पडताळणी करत असल्याचे आढळते.
 
अवकाशातील ग्रहांचे भ्रमण मार्ग विवृत्तीय असतात, म्हणून तर अभ्यासासाठी लोकमान्यांनी विवृत्ताची निवड केली असेल, असा विचार येतो. त्यांनी विवृत्ताचे कार्तेशीय तसेच प्राचलिक निर्देशक घेऊन समाकलनाच्या रीतीने विवृत्ताचे क्षेत्रफळ यशस्वीरीत्या काढले आहे. तथापि, विवृत्ताच्या धनूची लांबी काढण्यासाठी वारंवार गणित करूनही समाकलनाच्या प्राथमिक रीतीने निर्णायक उत्तर मिळत नाही. तथापि, समाकलनाच्या प्राथमिक रीतीने विवृत्ताची लांबी अशक्य आहे, असा जरी त्यांनी निष्कर्ष काढला असता, तरी तो संशोधनातील एक टप्पा ठरला असता. तुरुंगातील एकाकीपणात लोकमान्यांनी जो कंटाळवाणा वेळ बौद्धिक आनंदात व्यतीत केला, ज्यातून गीतारहस्य सारखे जे अमृत निष्पन्न झाले. ते ‘कॅल्कुलस’ वरील ग्रंथ संपन्न होऊन जरी झाले नसले, तरी या उपलब्ध वहीवरून टिळकांची गणिताची आवड वरवरची नसून किती सखोल होती, हे लक्षात येते.
लोकमान्यांच्या गणिती बुद्धिमत्तेचा आणखी एक चमकदार पैलू म्हणजे त्यांनी ज्योतिर्गणिताच्या सहाय्याने निश्चित्त केलेला वेदांचा काळ. जर्मन पंडित मैक्समुल्लरने इ.स. पूर्व १२०० च्या सुमारास वेद लिहिले गेले असावेत, असा सिद्धांत मांडला. तथापि, लोकमान्यांचे गणिती मन हे कबूल करीत नव्हते. शरद संपातात सूर्य आपल्या डोक्यावर असताना मकरवृत्तातून तो उत्तरेकडे सरकतो, प्राचीन ग्रंथातील शरद संपात कोणत्या नक्षत्रात आहे, त्याचे उल्लेख व संदर्भ, ऋग्वेदातील शरद संपात मृगशीर्षात आहे असा उल्लेख, मृगशीर्षला अग्रहायन ही पर्यायी संज्ञा , जिला ग्रीक भाषेत ‘ओरायन’ म्हणतात. तसेच श्रीकृष्णाने भगवद्गीतेतील ‘मासानां मार्गशीर्षोहम’ म्हंटल्याचे लोकमान्यांच्या लक्षात आले आणि त्यांना ‘मृगशीर्ष’ आणि ‘मार्गशीर्ष’ यातील साम्य इतके भावले की त्यांनी ज्योतिर्गणिताच्या आधारे वेदांचा काळ इ.पू. ४००० वर्षापासून ते इ.पू. २५०० वर्षापर्यत असावा, असा निष्कर्ष काढला. पुढे लोकमान्यांनी या संशोधनावर आधारित ‘ओरायन’ हा ग्रंथ लिहिला, जो विद्वज्जनांनी नावाजला. या उदाहरणावरून गणिताचा चौफेर उपयोग कसा करता येतो ते लोकमान्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या जयंती-पुण्यतिथी च्या निमित्ताने त्यांच्या गणितप्रेमाचा ध्यास सर्वांनी घेतल्यास तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
लोकसंग्रहाची दृष्टी राखून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला समाजातील सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गांधीजींच्या राजकीय-सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी लोकमान्यांनी निर्माण केली, असे म्हंटले तर उचित ठरेल. टिळकांनी भारतीय जनतेला एकत्र आणून आपल्या प्रखर विचारांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला. म्हणूनच भारताच्या इतिहासात टिळक हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. त्यांना विनम्र आदरांजली!
 

प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ, सांगली
९४२३८२९११७


*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
Powered By Sangraha 9.0