बहुविध प्रतिभेचे धनी डॉ. जयंत नारळीकर!

19 Jul 2022 06:00:25
 

dr jayant narlikar (Image Source : Internet)
 
 
जगप्रसिद्ध खगोल - भौतिक शास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांचा आज ८४ वा वाढदिवस. १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणीततज्ञ. ते वाराणसी येथील बनारस विश्व विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. तर आई सुमती या संस्कृत विदुषी होत्या. वाराणसी येथे शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या नारळीकर यांनी १९५७ साली विज्ञानाची पदवी (B.Sc) प्राप्त केली. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केम्ब्रिज येथे गेले. तिथे त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी या पदव्या मिळवल्या. शिवाय रँग्लर आणि खगोल शास्त्राचे टायसन मेडल आणि इतर अनेक बक्षिसे मिळवली. त्यांचे पिएचडीचे गाईड डॉ. फ्रेड हॉईल यांच्या साथीने त्यांनी स्थिर स्थिती सिद्धांतावर संशोधन केले व जगप्रसिद्ध बिग बँग सिद्धांताला आव्हान देणारा नवा सिद्धांत तयार केला.
 
१९७२ साली ते मुंबईत परतले. तिथे त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. जयंत नारळीकर यांनी ५ दशकांहून अधिक काळ खगोल आणि भौतिक शास्त्रात संशोधन केले. त्याचबरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू ठेवला. डॉ. जयंत नारळीकर हे रुढार्थाने साहित्यिक नसले, तरी त्यांनी केलेले लेखन हे दर्जेदार साहित्यिकापेक्षा कमी दर्जाचे नाही. विज्ञानकथेसारखा वेगळा प्रवाह मराठी साहित्यात रुजविण्याचे मोठे काम त्यांनी केले. विज्ञानासारखा रुक्ष आणि अवघड विषय ललित साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहचवण्याचे अवघड व महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांनी केलेले विज्ञानविषयक लेखन व सुरस विज्ञान कथा यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली.
 
खगोल शास्त्रात सातत्याने संशोधन करत असताना डॉ. जयंत नारळीकरांनी लेखनही चालू ठेवले. त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहिल्या. त्यांची यक्षाची देणगी, अंतराळवीर, भस्मासुर, टाइम मशीनची किमया, प्रेषित, अभयारण्य, याला जीवन ऐसे नाव, वामन परत आला, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे, नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेचे अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रयचिते ही पुस्तके गाजली. त्यांनी लिहिलेले आकाशाशी जडले नाते व अंतराळ आणि विज्ञान ही पुस्तके प्रचंड गाजले. ही पुस्तके म्हणजे त्यांच्या दर्जेदार साहित्याचे उत्तम उदाहरण आहेत. तीन नगरातील माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिध्द आहे.
 
यक्षाची देणगी या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. सामान्य माणसाला खगोल शास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले. आपल्या लेखनातून त्यांनी अंधश्रद्धा दूर करण्याचाही प्रयत्न केला. बहुविध प्रतिभेचे धनी असलेले डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या व्रतस्थ व्यक्तीमत्वास ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले,  हा त्यांच्या बहुविध प्रतिभेचा गौरव होता. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखे जेष्ठ विज्ञानविषयक लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनल्यामुळे विज्ञान साहित्याला अधिकाधिक प्रतिष्ठा लाभली. तसेच विज्ञानाचा प्रसार होण्यास व तरुण पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास त्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा खूप उपयोग झाला. डॉ. जयंत नारळीकर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५


*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
Powered By Sangraha 9.0