राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्लास्टिक विरोधात मोठी कारवाई

    12-Jul-2022
Total Views |
 
kharra
 
नागपूर :
 
जगातील समस्या बनलेल्या प्लास्टिक संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोठी कारवाई केली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नागपुरातून ४७९ किलो प्रतिबंधित खर्रा पन्नी जप्त केली आहे.
 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वाडी स्थित जगदंबा ओव्हरसीज येथील गोडावूनमध्ये आकस्मीकपणे प्रत्यक्ष पाहणी केली असता, या गोडावून परिसरात ४७९ किलोग्रॅम प्रतिबंधित प्लास्टिक खर्रा पन्नी साठवलेली आढळून आली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी खर्रा पन्नी जप्त केली. त्याचबरोबर गोडावूनवर प्राथमिक गुन्हा दंड ५ हजार रूपये आकारणी करण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने एमआयडीसी हिंगणा येथील ५ उद्योगावर कारवाई करून १.५ टन प्रतिबंधित प्लास्टिक ६ जुलै रोजी जप्त केला होता. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पथकात क्षेत्र अधिकारी, मनोज वाटाणे उप-प्रादेशिक अधिकारी नागपूर-2 आनंद काटोले व प्रादेशिक अधिकारी अशोक करे यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही करण्यात आली.
 
राज्यात २३ मार्च २०१८ पासुन प्लास्टिक पिशव्या व नॉन ओवन प्लास्टिक पिशव्यांचा वापर प्रतिबंधीत करण्यात आला आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या गेल्या वर्षी १२ ऑगस्ट रोजी अधिनियम काढत १ जुलै पासून एकल प्लास्टिकचे उत्पादन, वापर, साठवणूक, वाहतूक व विक्री करण्यावर बंदी घातली आहे.
 
प्रतिबंधीत एकल प्लास्टीकची विक्री, वाहतूक, साठवणूक, वापर व उत्पादन केल्यास प्रथम दंड ५ हजार रूपये, द्वितीय दंड १० हजार रूपये व तृतीय दंड. २५ हजार रुपये त्याचबरोबर तीन महिन्याची कैद ही तरतूद आहे.