महाराष्ट्रात पावसाचा कहर; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर

    11-Jul-2022
Total Views |

cm-dcm on gadchiroli visit (Image Source : Internet)
 
नागपूर :
देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अनेक ठिकाणी पाणी अधिक प्रमाणात भरल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात देखील गेल्या २४ तासांपासून सतत पाऊस पडत असून त्यात सुमारे ९ जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रविवारी दिली.
 
रायगड जिल्ह्यातून वाहणारी कुंडलिका नदीसह राज्यातील अनेक नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर गेले आहे. तसेच उल्हास, सावित्री, पाताळगंगा, अंबा आणि गढ़ी नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा थोडी खाली आहे. अशात गडचिरोली जिल्ह्यात २ दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील नदी, नाले ओसंडून वाहत असून जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत.
 
 
 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर गडचिरोली दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गडचिरोली दौऱ्यावर निघालो आहे.'
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आज दुपारी ४.१५ वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले.
तत्पूर्वी, विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला. त्यानंतर खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले. गडचिरोलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते संध्याकाळच्या सुमारास पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनबरोबर आढावा बैठक घेणार आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.