गावमधले घर कौलारू : स्मरणातला प्रवास

    14-Jun-2022
Total Views |

gaon1
(Image Source : Internet)
 
नागपूर : गाव म्हटलं की तेथील सर्वसामान्य लोकांच्या गरजा, सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा आणि असंख्य आवाहने आलीच. ही गोष्ट आहे माझ्या लहानपणीची. माझेही आयुष्य गावातच गेले. पण, त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाला की आम्हाला आनंदच होत असे. किर्रर्र-काळ्याभोर अंधारात आम्ही सात मित्र खेळलेलो लप्पाछुप्पीचा खेळ आजची स्मरणात आहे. खरं बघता लहानपणीच आम्ही अंधारात वाट काढायला शिकलो, असेच म्हणता येईल.
 
खेळतेवेळी एखादा व्यक्ती सापडला तर तो इतरांना मदत करत असे आणि त्यामुळे खेळही रंगत असे. मात्र, आता तसे काहीही उरले नाही. शहरात वीजपुरवठा खंडित झाला तरी इन्व्हर्टर आहेच. शिवाय इकडची घरेही सिमेंटची आणि जीवनशैली म्हणाल तर अगदी घड्याळाच्या काट्यावर धावणारी. पण गावात तसे कधी नव्हतेच. सूर्याची किरणे आणि कोंबड्यांचे आरवणे कानी पडले की दिवसाची सुरुवात होत असे.
 
gaon2 (Image Source : Internet)
 
माझ्या गावच्या घरी समोर मोकळे अंगण आहे. भल्या सकाळी आई अंगणात शेणपाण्याचा सडा टाकून छान रांगोळी काढायची. आता शहरात रांगोळी फक्त दिवाळीच्या दिवशीच पाहायला मिळते. त्यानंतर गावातील घरी समोर व्हरांडा असायचा. त्याला शहरात पोर्च म्हणतात. माझ्या घरी व्हारांड्यात काळ्या रंगाची फरशी होती. येथेच आम्ही मित्र अष्टाचौवा (ल्युडो) खेळायचो. सुट्ट्यांमध्ये माझ्या मामाचे मुलं गावी यायचे. ते अष्टाचौवा सारखा एक खेळ सोबत आणत. त्याला ते लुडो (ludo) म्हणायचे. लुडोमध्ये डाईस तर आमच्या खेळात कवड्या असायच्या. कवड्यांनी जितके अंक पडायचे तितके घर आमची गोटी समोर सरकायची फक्त एवढाच फरक.
 
माझ्या घराच्या समोरच्या भिंतीवर दोन खिडक्या असल्यामुळे घरात नेहमीच थंड हवा आणि सूर्यप्रकाश येतो. यामुळे घरातील वातावरणही सतत निर्मळ राहतं. माझ्या घरात चार खोल्या आहेत. पहिली समोरची खोली, तिला आम्ही छपरी म्हणायचो. शहरात त्याला हॉल म्हणतात. छपरीत टीव्ही होता. लहानपणी घडलेला टीव्हीबद्दलचा एक मजेदार किस्सा आजही आठवतो. जेव्हा आमच्या टीव्हीमध्ये नो-सिग्नल यायचा तेव्हा आम्ही दोन भाऊ आणि माझे बाबा शिडी लावून घरावर चढायचो आणि टीव्हीची छत्री हलवायचो. त्यावेळी साधलेला संवाद आजही कानी घुमतो.

gaon3 (Image Source : Internet)
 
छपरीत आम्ही नेहमी तीन खुर्च्या ठेवायचो. अचानक कोणी पाहुणे आले तर त्यांच्या बसण्यासाठी. येथे शहरात मात्र एलसीडी, सोफा अन् बरेच काही आहे. गावाकडच्या स्वयंपाक घरात चुलीचा सुगंघ आता मात्र अनोळखी झाला आहे. तेथेच आई स्वयंपाक करून भाजी भाकऱ्या बनवायची आणि मी आणि माझा भाऊ चपाती सर्वात आधी घेण्यासाठी भांडायचो. तेथे माझी स्वतंत्र खोली होती. अभ्यास करायला टेबल खुर्ची होती. एक छोटेसे कपाट होते. मी माझे पुस्तकं आणि कपडे ठेवायचो.
 
घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेला आम्ही वाडी म्हणतो...
वाडीत खूप झाडे आहेत. आंबा, पेरु, सिताफ़ळ, डाळिंब ही फळझाडे आहेच पण आईने मेथी, पालक, लालभाजीसारख्या पालेभाज्याही लावल्या आहेत. कायम ताज्या भाज्या खायला मिळाव्या आणि स्वास्थ्य उत्तम राहावे ही त्यामागची भावना. आजही अनेक गोष्टी आठवतात. सगळ्याच शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण गावाला जायची इच्छा होते. गावातील वातावरण, शेतात फिरण्याची मजा, बैलाची दोरी पकडून त्याला हाक मारणे, हे सर्वच खूप आठवतं. आज शहरात बऱ्याच सोइ-सुविधा आहेत. परंतु, गावात जसं मन रमतं, तसं शहरात रमत नाही. शहरातील लोक मोबाईलवरच बोलून मोकळे होतात. व्हॉट्सॲपवर चॅट करतात. आज मला माझं गाव, माझं गावचं घर आणि माझे मित्र या सर्व गोष्टी खूप आठवतात.
 
 
लेखक : ऋत्विक बुटके
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.